नागपूर : वर्षाच्या सुरुवातीला भयावह ठरलेली कोरोनाची दुसरी लाट मागील चार महिने नियंत्रणात असताना वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात तब्बल ९० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात नागपूर शहरात ८१, ग्रामीणमधील ८ तर जिल्ह्याबाहेरील १ रुग्ण आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,९४,०४९ वर पोहचली असून, ६५ दिवसानंतरही मृत्यूची संख्या १०,१२२ वर स्थिर आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने काळजीचे वातावरण आहे. गुरुवारी झालेल्या ५,१७२ चाचण्यांमधून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा दर ०.५ टक्के होता. परंतु शुक्रवारी झालेल्या ४,४४२ चाचण्यांमधून बाधित रुग्णांचा दर हा २ टक्क्यांवर गेला आहे. शहरात आज झालेल्या ३,०९४ चाचण्यांमधून पॉझिटिव्हचा दर २.६१ टक्के तर ग्रामीणमध्ये झालेल्या १३४८ चाचण्यांमधून हा दर ०.५९ टक्के होता. आज १८ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ४,८३,६५६ झाली आहे.
१० जूननंतर पहिल्यांदाच ९० रुग्ण
कोरोनाची दुसरी लाट मे महिन्यापासून ओसरू लागली. १० जून रोजी दैनंदिन रुग्णांची संख्या १०० च्या आत आली. पहिल्यांदाच ९१ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर आज सहा महिन्यानंतर रुग्णांची संख्या ९० वर पोहचली. सध्या नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून २७१ झाली आहे.
वर्षभरात ३,५४,९९३ रुग्ण
२०१९ मध्ये कोरोनाच्या १,३९,०५६ रुग्णांची नोंद असताना २०२० मध्ये यात ३९ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या ३,५४,९९३ झाली. जानेवारी महिन्यात १०,५०७ रुग्ण आढळून आले होते. मार्च महिन्यात यात वाढ होऊन रुग्णसंख्या ७६,२५० वर पोहचली. एप्रिल महिन्यात १,८१,७४९ या विक्रमी रुग्णांची नोंद झाली. मात्र जुलै महिन्यात यात प्रचंड घट होऊन ही संख्या ५०६ वर आली. नोव्हेबर महिन्यात रुग्णसंख्या १६२ असताना डिसेंबर महिन्यात पुन्हा वाढ होऊन ४५३ झाली आहे. हे तिसऱ्या लाटेचे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.