सावनेर/काटोल/हिंगणा/कळमेश्वर/नरखेड/कुही/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संक्रमणाचा वेग वाढला आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात बुधवारी २५२ रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक ५८ रुग्णांची नोंद सावनेर तालुक्यात झाली. काटोल तालुक्यात पुन्हा २६ रुग्णांची भर पडली.
वर्दळीच्या सावनेर शहरातून तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात संक्रमण होत आहे. बाधितांमध्ये शहरात रोजगारांसाठी येणाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. बुधवारी सावनेर शहरात (१६), दहेगाव (१८), खापा (८), परसोडी (३), मंगसा, चनकापूर, वाकोडी येथे प्रत्येकी दोन तर पाटणसावंगी, चिंचोली, खापरखेडा, सावंगी, कोटोडी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
काटोल तालुक्यात बुधवारी आणखी २६ रुग्णांची भर पडली. यात काटोल शहरातील २४ तर ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा समावेश आहे. काटोल शहरात चांडक नगर येथे चार, सरस्वती नगर, तारबाजार, आयू.डी.पी. येथील प्रत्येकी तीन, पंचवटी, रेल्वे स्टेशन, जानकी नगर येथे प्रत्येकी दोन तर राठी ले-आउट, लक्ष्मी नगर, धवड ले-आऊट, कुणबीपुरा, राऊतपुरा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये मसली व पारडसिंगा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ७२६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात २१ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथील ८, डिगडोह व टाकळघाट येथीवल प्रत्येकी ४, हिंगणा (२) तर देवळी आमगाव, वडधामना, रायपूर प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४२८६ इतकी झाले आहे. यातील ४००३ रुग्ण कोरोना मुक्त झाले. तालुक्यात आतापर्यंत १०२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कळमेळश्वर तालुक्यात आणखी ९ रुग्णांची भर पडली आहे. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील दोन तर ग्रामीण भागात धापेवाडा येथे दोन तर सावळी (बु), पारडी देशमुख, वरोडा, घोराड, तेलकामठी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे.
नरखेड तालुक्यातील कोरोनाची साखळी कायम आहे. तालुक्यात १० रुग्णांची आणखी भर पडली. यात नरखेड शहरातील ६ तर ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे. सध्या ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १७५ तर शहरात ९९ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात भारसिंगी, सिंजर येथे प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली.
रामटेक ग्रामीणमध्ये
बाधितांची संख्या अधिक
रामटेक तालुक्यातील ग्रामीण भागात बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. बुधवारी तालुक्यात १२ रुग्णांची भर पडली. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११३७ झाली आहे. यातील हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी रामटेक शहरातील नेहरु वॉर्ड येथे दोन तर भगत सिंग वॉर्डात एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात मनसर येथे ४ तर देवलापार, सोनेघाट, चारगाव, सराखा व मांद्री येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार यांनी दिली.
कुहीतही धोका वाढला
कोरोनामुक्ती वाटचाल करणाऱ्या कुही तालुक्यातही बाधितांची संख्या वाढली आहे. बुधवारी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये १३ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी मेंढगाव, कुही, पचखेडी, वेलतूर, तारणा येथे २४० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. बाधितांना स्वगृही विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय निकम यांनी सांगितले.