लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गापासून बचावासाठी मास्क, हॅण्ड सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. कुणाला थकवा, डोकेदुखी, जास्त घाम येणे, सर्दी, ताप, खोकला असल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेण्याचे आवाहन डॉ. जय देशमुख यांनी येथे केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित सेमिनारमध्ये त्यांनी व्यापाऱ्यांना सल्ला दिला. कोरोना संसर्गापासून बचाव करण्याचे त्यांनी उपाय सांगितले. ते म्हणाले, कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाने घाबरू नये. स्वत:ला क्वारंटाईन करून रोज पल्स रेट, टेम्परेचरचा चार्ट तयार करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचे सेवन करावे. हा आजार ६० वर्षांवरील व्यक्तींना जीवघेणा ठरू शकतो. अखेर सर्वांनी नैतिक, सामाजिक जबाबदारी समजून कोरोना नियमांचे कठोरतेने पालन केले पाहिजे. तिवारी यांनी मनपातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, मनपाने सरकारी रुग्णालयासह ३२ खासगी रुग्णालयांना कोरोना उपचारासाठी आरक्षित केले आहे. रुग्णालयात बेड, अॅम्ब्युलन्स, हेल्पलाईनची व्यवस्था केली आहे. अहिरकर म्हणाले, प्रशासनाने सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांनाही कोरोना उपचारासाठी निर्देश जारी केले आहेत. कोरोना रुग्णालयात संक्रमित रुग्णांची माहिती कुटुंबीयांना दिली जात नाही. सरकारी रुग्णालयांमध्येही आदेशाचे उल्लंघन होत आहे. याकरिता सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग करण्यात यावा.