लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, बार, रेस्टॉरेन्ट, क्लब, देशी दारूची दुकाने, शॉपिंग मॉल, पानठेले यासह अन्य दुकाने (अत्यावश्यक वस्तू वगळता) ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. परंतु, गुरुवारी काहींनी हा आदेश झुगारून हॉटेल्स, नास्ता, चहा, लिंबूपाणी, उसाचा रस, पान व खऱ्र्याची दुकाने सुरू ठेवली. ही बेजबाबदार कृती संपूर्ण समाजाला संकटात ओढणारी आहे. त्यामुळे अशा कोरोना वाहकांवर तातडीने कडक कारवाई करण्याची गरज आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शहरभर गस्त घातली तरच, हे शक्य होणार आहे.लिंबूपाणी, उसाचा रस घातकलिंबूपाणी व उसाच्या रसामध्ये बर्फ मिसळवला जातो. कोरोना विषाणू थंड परिस्थितीत अधिक काळ जिवंत राहतो व फोफावतो. त्यामुळे लिंबूपाणी व उसाचा रस पिणे नागरिकांसाठी अधिक घातक आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी लिंबूपाणी व उसाच्या रसाचे ठेले लागले आहेत. नागरिक लिंबूपाणी व उसाचा रस पिण्यासाठी गर्दी करीत आहेत. लिंबूपाणी व उसाचा रस पिऊन झाल्यानंतर काचाचे ग्लास योग्य पद्धतीने स्वच्छ केले जात नाहीत. बादलीभर पाण्यामध्ये वारंवार ग्लास धुतले जातात. त्यातून कोरोना विषाणूचा वेगात फैलाव होऊ शकतो. प्रशासनाने ही बाब सर्वाधिक गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. लिंबूपाणी व उसाच्या रसाचे ठेले तातडीने बंद केले गेले पाहिजे.व्हीसीए स्टेडियममधील हॉटेल्स उघडेसिव्हिल लाईन्सस्थित व्हीसीए स्टेडियममधील काही हॉटेल्स अर्धवट उघडे ठेवण्यात आले होते. ग्राहकांना आत घेऊन चहा, कॉफी व खाद्य पदार्थ दिले जात होते. बडे व्यावसायिक असल्यामुळे त्यांचे फावत असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. कोरोना हा संपूर्ण समाजाला संकटात ओढणारा विषाणू आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची प्रशासनाकडे तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर, तक्रारीवरून कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला गेला पाहिजे.वस्त्यांमध्ये सर्वाधिक दुकाने सुरूवस्त्यांमधील सर्वाधिक दुकाने सुरू होती. ही दुकाने मुख्य मार्गांवर नसल्यामुळे अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे कारवाई झाली नाही. नागरिकांनी या दुकानांमध्ये बिनधास्तपणे नाश्ता केला. त्यानंतर चहा पिला व खर्रा खरेदी करून घर गाठले. बजरंगनगर, हनुमाननगर, बेसा, हुडकेश्वर, बिडीपेठ, वाठोडा, दर्शन कॉलनी, खरबी, चक्रपाणीनगर, पिपळा, विश्वकर्मानगर, अयोध्यानगर यासह अनेक वस्त्यांमध्ये हे चित्र दिसून आले.मुख्य रस्त्यांवर काटेकोर पालनमुख्य रस्त्यांवरील दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे काटेकोर पालन केले. गणेशपेठ बसस्थानक, कॉटन मार्केट, रेल्वेस्थानक, धरमपेठ, महाल, इतवारी, मंगळवारी, सदर, सिव्हिल लाईन्स, रामदासपेठ, शिवाजीनगर, शंकरनगर, बजाजनगर, लक्ष्मीनगर, प्रतापनगर, खामला यासह अन्य वर्दळीच्या ठिकाणी चहा, लिंबूपाणी व उसाच्या रसाची एक-दोन दुकाने वगळता अन्य दुकाने बंद होती. त्यामुळे या परिसरात गर्दीही कमी दिसून आली.
नागपुरात शहरभर कोरोना वाहक : काहींनी बंदचा आदेश झुगारला, कडक कारवाई करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 9:37 PM
जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, बार, रेस्टॉरेन्ट, क्लब, देशी दारूची दुकाने, शॉपिंग मॉल, पानठेले यासह अन्य दुकाने (अत्यावश्यक वस्तू वगळता) ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. गुरुवारी काहींनी हा आदेश झुगारून हॉटेल्स, नास्ता, चहा, लिंबूपाणी, उसाचा रस, पान व खऱ्र्याची दुकाने सुरू ठेवली.
ठळक मुद्देठिकठिकाणी हॉटेल्स, नास्ता, चहा, लिंबूपाणी, पानटपऱ्या सुरू