हिंगणा/कळमेश्वर/काटोल/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात कोरोनाची साखळी अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यात शनिवारी ५६ रुग्णांची नोंद झाली. हिंगणा तालुक्यात १५५ नागरिकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तीत ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे दोन तर डिगडोह, भारकस, सावंगी व टाकळघाट येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यातील बाधितांची संख्या ३६८५ झाली आहे. यातील ३३५१ रुग्ण बरे झाले आहेत. कळमेश्वर तालुक्यात शनिवारी ३ रुग्णांची भर पडली. यात तालुक्यातील वाढोणा,घोगली व घोराड येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात शनिवारी ५ रुग्णांची नोंद झाली. यात वाहीटोला येथील चार व परसोडा येथील एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली. सध्या तालुक्यातील रुग्णसंख्या ८८५ झाली असून यातील ७९८ रुग्ण बरे झाले आहे. काटोल तालुक्यात शनिवारी १०६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.