काटोल/कळमेश्वर/हिंगणा/कन्हान/कुही : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढताना दिसत आहे. काटोल, कळमेश्वर आणि हिंगण्यातील कोरोना साखळी अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुरुवारी ९२ रुग्णांची नोंद झाली. काटोल तालुक्यात गुरुवारी ९६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. काटोल शहरातील तार बाजार आणि बस स्टॅण्ड परिसरात प्रत्येकी दोन तर आययूडीपी, रेल्वे स्टेशन परिसर, जानकीनगर, हरदोस ले-आऊट परिसरात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीणमध्ये गोंडीमोहगाव व पारडसिंगा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कळमेश्वर तालुक्यात गुरुवारी ८ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरात २, धापेवाडा (५) तर तोंडाखैरी येथे एका रुग्णाची नोंद झाली. हिंगणा तालुक्यात आणखी तीन रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात गुरुवारी ६७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात वानाडोंगरी येथे दोन तर डिगडोह येथे एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात सध्या बाधितांची संख्या ३५८५ इतकी झाली आहे. यातील ३३५१ रुग्ण बरे झाले आहेत. पारशिवनी तालुक्यात कांद्री कोविड सेंटर येथे २३ नागरिकांची चाचणी करण्यात आली. यात कन्हान येथील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत ८४४ बाधितांची नोंद झाली आहे. यातील ८०१ रुग्ण बरे झाले आहेत.
कुही तालुक्यात गुरुवारी कुही, मांढळ व वेलतूर येथील २३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात कुही येथे एका रुग्णाची नोंद झाली. कुही तालुक्यात आतापर्यंत ५०४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील ४३२ रुग्ण बरे झाले आहेत.