काटोल : उन्हाळ्यात शीतपेयांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. गतवर्षी झालेले नुकसान यंदा भरून निघेल या आशेने या क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक होते. मात्र मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याचा मोठा फटका शीतपेय विक्री व्यवसायाला बसत आहे.
काटोल तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील बाजारपेठेत, बसस्थानक परिसरात फेब्रुवारी महिन्यापासून ज्युसबार, शीतपेय व्यवसाय, रसवंतीची दुकाने थाटू लागतात. उन्हाळ्याच्या चार महिन्यात वर्षभराचे उत्पन्नाचे नियोजन शीतपेय व्यावसायिक करून ठेवतात. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बस स्थानक, पाळोदी रस्ता, आठवडी बाजार परिसर, पोलीस ठाणे परिसर, कापड मार्केट, नगरपालिका परिसर आदी भागांत शीतपेयांची दुकाने सुरू झाली.
स्थानिक व्यावसायिकांसह परराज्यातील आईस्क्रीम, लस्सी विक्रेत्यांनीही आपली दुकाने थाटली. मात्र मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शीतपेयाच्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत नागरिक थंडपेय दुकानांमध्ये गर्दी करत असतात. मात्र काटोल शहरात सध्या या दुकानाकडे कोरोनाच्या भीतीने नागरिकांनी पाठ फिरवली आहे.