लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे आयोजित नीट ही पात्रता परीक्षा अखेर रविवारी ऑफलाईन माध्यमातून पार पडली. कोरोना संकटामुळे ही परीक्षा कधी होते याबाबत विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. अखेर परीक्षा नीट झाल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नागपुरात १५ हून अधिक केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली व विदर्भातून हजारो विद्यार्थी परीक्षेला बसले. परीक्षा सुटल्यावर पाऊस असल्याने विद्यार्थ्यांची काही प्रमाणात तारांबळ उडाली.
कोरोनामुळे नीट लांबणीवर पडली होती. रविवारी विदर्भातील विविध भागांतूनदेखील विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. दुपारी २ ते ५ या कालावधीत परीक्षा पार पडली. यंदा १३ भाषांमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यात आली. मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५० पर्सेंटाइल मिळणे आवश्यक आहे. ऒबीसी, अनुसूचित जाती आणि जमाती यांच्याकरिता ही पातळी ४० पर्सेंटाइल इतकी निश्चित करण्यात आली आहे.
परीक्षेनंतर कोरोनाच्या नियमांची पायमल्ली
शहरातील विविध परीक्षा केंद्रांजवळ वाहनांची गर्दी झाली होती. विशेषत: बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकदेखील होते. ग्रामीण भागातील अनेक पालक तर विशेष कार करूनदेखील आले होते. परीक्षा सुटल्यावर पाऊस सुरू असल्याने छत्री घेऊन पालक प्रवेशद्वाराजवळ एकत्रित आले. सर्वच जण दाटीवाटीने उभे होते व त्यांच्यावर नियंत्रण आणणे कठीण झाले होते. काही परीक्षा केंद्रांसमोर वाहतुकीची कोंडीदेखील झाली होती.
जीवशास्त्राने दिला आधार
मागील वर्षीच्या तुलनेेत यंदा नीटचे पेपर सोपे असल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. रसायनशास्त्र व भौतिकशास्त्राच्या तुलनेत जीवशास्त्राचा बहुपर्यायी प्रश्न असलेला पेपर जास्त सोपा होता. बाकीचे दोन्ही पेपरदेखील बहुपर्यायी असले तरी काहीसे दीर्घ होते. यंदा ओएमआर शीटवर बॉलपेनने उत्तरे द्यायची होती.
कोरोनाच्या नियमावलीचे पालन
एनटीएतर्फे सर्व परीक्षा केंद्रांना कोरोनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर तापमान तपासणीनंतरच आत प्रवेश देण्यात आला. मास्क व सॅनिटायझर वापरणेदेखील अनिवार्य होते.
-