सावनेर/कामठी/काटोल/नरखेड/कळमेश्वर/ कुही/ उमरेड/ रामटेक /कन्हान : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमण साखळी अधिक घट्ट होताना दिसत आहे. बुधवारी जिल्ह्यातील तेरा तालुक्यात ७८२ रुग्णांची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ४०९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ९४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे ४२, डिगडोह (१५), नागलवाडी (१२), हिंगणा (५), टाकळघाट, कान्होलीबारा, नीलडोह येथे प्रत्येकी ४, देवळी काळबांडे (३), रायपूर (२) तर इसासनी, संगम, अडेगाव, मोंढा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५,३४० इतकी झाली आहे. यातील ४,२०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ११२ जणांचा मृत्यू झाला आहे.
कळमेश्वर तालुक्यात ७१ रुग्णांची भर पडली आहे. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील १० तर ग्रामीण भागात गौंडखैरी येथे १७, तिडंगी (१०), पिपळा, परसोडी येथे प्रत्येकी ४, वरोडा,धापेवाडा, म्हसेपठार, आष्टीकला येथे प्रत्येकी ३, मोहपा, कोहळी, सुसंद्री, कळंबी येथे प्रत्येकी दोन तर उबाळी, सोनपूर, तेलगाव, तिष्टी, लिंगा, पानउबाळी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कुही तालुक्यात १३६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात मांढळ येथे ५, मांगली (३), कुही शहर (२), टेंभरी, तारणी, हरदोली, नेवरी, साळवा व आकोली येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ९१६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
नरखेड तालुक्यात २३ रुग्णांची भर पडली. यात ३ रुग्ण शहरातील २० ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६६ तर शहरातील ६० इतकी झाली आहे. ग्रामीण भागात मदना येथे ५, थाटूरवाडा, भिष्णूर, नारसिंगी येथे प्रत्येकी ३, साखरखेडा (२) तर मोवाड, तिनखेडा, रोहणा, सिंजर येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली.
उमरेड तालुक्यात १३ रुग्णांची नोंद झाली. यात १० रुग्ण शहरातील, २ ग्रामीण भागातील तर अन्य तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
पारशिवनी तालुक्यातील कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४६ रुग्णांची नोंद झाली. या केंद्रांतर्गत आतापर्यंत १,३२६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील ९८८ रुग्ण बरे झाले आहेत तर ३३ जणांचा मृत्यू झाला आहे.
काटोल, ग्रामीणमध्ये धोका वाढला
काटोल तालुक्यातील कोरोनासाखळी गतवर्षभरापासून अबाधित आहे. बुधवारी तालुत्यात ९० रुग्णांची नोंद झाली. तीत ३९ रुग्ण शहरातील तर ६१ ग्रामीण भागातील आहेत. शहरी भागामध्ये पंचवटी येथे पाच, आययुडीपी, धंतोली येथे प्रत्येकी चार, लक्ष्मीनगर, अण्णा भाऊ साठे नगर, गळपुरा येथे प्रत्येकी तीन, देशमुखपुरा, जानकीनगर, तारबाजार येथे प्रत्येकी दोन, हत्तीखाना, खोजा ले-आऊट, शनिचौक, अनुसयापुरम, रामदेवबाबा ले-आऊट, काळे चौक, लाखे ले-आऊट, पेठबुधवार, दोडकीपुरा, शारदाचौक, रेल्वेस्टेशन येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात कुकडी पांजरा येथे अठरा रुग्ण, मसाळा (९), कोंढाळी (८), कारला व आजनगाव येथे प्रत्येकी तीन, रिधोरा, लाडगाव, डोरली भिंगारे, गोंडीदिग्रस, येनवा येथे प्रत्येकी दोन तर चिचाळा, फेटरी, ढवळापूर, पानवाडी, पंचधार, वाढोणा, मसली, कलंबा, मेंडकी, गरमसूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.