लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लठ्ठ व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत जास्त असतो. विशेष म्हणजे, कोरोनाचा संसर्ग झाल्यास आजार गंभीर होऊन मृत्यचा धोका राहत असल्याचे एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात नागपुरात साधारणत: २३.३ टक्के महिला तर १८.४ टक्के पुरुष लठ्ठ आहेत. यामुळे भीती नको परंतु काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
भारतात समृद्धी वाढत असतानाच लठ्ठ लोकांचे प्रमाणही वाढत असून ते हाताबाहेर चालले आहे. लठ्ठपणात भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंता लावणारी आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या २८ हजार तर मृत्यूची संख्या हजारावर पोहचली आहे. मृतांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक असून, ५० वर्षांवरील रुग्णांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येमुळे राज्याच्या आरोग्य विभागाचे लक्ष नागपूरकडे लागले आहे. यामुळे आता तज्ज्ञ चमूकडून नागपूरची पाहणी करणार आहे. नागपुरात लठ्ठ व्यक्तींचे प्रमाण वाढत आहे. कोरोना व लठ्ठपणा यावर ब्रिटिश आरोग्य विभागाच्या पब्लिक हेल्थ इंग्लंड संस्थेने नुकताच एक अभ्यास केला आहे. यात लठ्ठ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल करण्याची गरज जास्त असते. अनेकदा अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्याची जास्त आवश्यकता असते. जेवढे जास्त वजन तेवढा जास्त धोका राहत असल्याचे मत मांडले आहे.
शहरी भाागत २७.५ टक्के महिला लठ्ठकेंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने २०१५-१६ मध्ये लठ्ठपणावर सर्वेक्षण करण्यात आले. यात १५ ते ४९ वयोगटातील महिलांचा समावेश करण्यात आला. सर्वेक्षणात नागपूर शहरातील २७.५ टक्के महिलांचे ‘बॉडी मास इन्डेक्स’ (बीएमआय) २५ किलो प्रतिवर्गमीटरपेक्षा जास्त आढळून आले, तर ग्रामीण भागातील १२.४ टक्के महिला या जास्त वजनाच्या असल्याचे समोर आले. एकूण २३.३ टक्के महिलांमध्ये ही समस्या दिसून आली.
शहरी भागात १९.२ टक्के पुरुष लठ्ठसर्वेक्षणात नागपुरातील १८.४ टक्के पुरुष हे लठ्ठपणाला बळी पडल्याचे नोंदविण्यात आले आहे. यात शहरी भागातील १९.२ टक्के तर ग्रामीण भागातील १७ टक्के पुरुषांचा समावेश आहे. तज्ज्ञानुसार, गेल्या एक दशकात लठ्ठपणामध्ये ६ ते ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, रक्तदाबाचा आजारही वाढला आहे.
कोरोनाच्या मृतांमध्ये मधुमेहींची संख्या अधिकनागपुरात रविवारपर्यंत १०११ मृत्यू झाले. यात मधुमेह असलेल्यांची संख्या मोठी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु तो डाटा उपलब्ध नसल्याने निश्चित आकडा सांगणे कठीण असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या याच सर्वेक्षणात नागपुरात ४.८ टक्के महिलांमध्ये तर १०.६ टक्के पुरुषांमध्ये उच्च मधुमेह असल्याचे पुढे आले आहे.
लठ्ठपणा हा एक आजार आहे. तो होण्यामागे काही विशिष्ट कारणे असतात. त्यामध्ये शरीराला हालचाली नसणे, बैठीकामे, अधिक उष्मांकाचा आहार यांचा समावेश होतोच. पण अनुवांशिकता आणि शरीराच्या चयापचय क्रियातील असमतोल ही कारणे असतात. लठ्ठपणा व कोरोना याचा अभ्यास आपल्याकडे झालेला नाही. यामुळे यावर विशेष काही बोलता येणार नाही. परंतु बहुतांश लठ्ठ व्यक्तींमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाबाचा आजार दिसून येत असल्याने काळजी घेणे, कोरोनाला दूर ठेवणे आवश्यक आहे.-डॉ. राजेश गोसावीप्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल