लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तापमान वाढत जाईल तसतसा कोरोनाचा प्रसार कमी होईल, असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान(नीरी)ने केलेल्या संशोधनातून वाढत्या तापमानासह कोरोनाचे संक्रमण घटत असल्याचे आढळून आले आहे. परंतु, त्यासोबत शारीरिक अंतराचे पालन करणे अत्यावश्यक आहे.नीरीने तापमान व आर्द्रतेचा कोरोना संक्रमणाशी असलेल्या संबंधावर संशोधन केले. त्यात मुंबई, चेन्नई, श्रीनगरसह केरळ येथील काही शहरांचा समावेश करण्यात आला. तापमान वाढल्यानंतर कोरोनाचे संक्रमण कमी होत असल्याचे या संशोधनातून आढळून आले. परंतु, त्यासोबत शारीरिक अंतर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. गर्दी केल्यास तापमानाचा फायदा मिळत नाही. आर्द्रतेचा मात्र कोरोनासोबत थेट संबंध दिसून आला नाही. नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञ डॉ. हेमंत भेरवानी, डॉ. अंकित गुप्ता व डॉ. अवनिश अंशुल यांनी हे संशोधन केले. जाणकारांच्या माहितीनुसार थंड वातावरणामध्ये कोरोना व्हायरस जमिनीवर ७२ तासापर्यंत सक्रिय राहू शकतो. ३५ डिग्री व त्यापेक्षा जास्त तापमानामध्ये कोरोना संक्रमण कमी होत असल्याचे दिसून येत आहे.शारीरिक अंतराशिवाय फायदा नाहीभारताला वाढत्या तापमानाचा व वातावरणाचा फायदा मिळत असला तरी, केवळ त्या आधारावर कोरोना संकटाला सहजतेने घेता येणार नाही. शारीरिक अंतराचे पालन केले तरच वाढत्या तापमानाचा फायदा मिळेल. गर्दी करून राहिल्यास तापमानाचा काहीच फायदा मिळणार नाही.- डॉ. राकेशकुमार, संचालक, नीरी.