लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सृष्टीची किमयाच सारी.. मारे तो शैतान, तारे सो भगवान. आधी निसर्गाची अधोगती करायची आणि नंतर निसर्ग कोपला की गोंधळ माजवायचा. ‘कोरोना’ हा त्याच कोपातला एक भाग आणि या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र ‘त्राहीमाम त्राहीमाम’ माजला आहे. माणूस कितीही विज्ञानवादी असला आणि मानवाला त्याच्या कुशल बुद्धीवर प्रचंड विश्वास असला तरी त्यालाही मर्यादा आहेत. जेव्हा त्या मर्यादेचे भान होते आणि तेव्हा माणूस निसर्गशक्तीला शरण जातो. ही तीच निसर्गशक्ती आहे जिला कोणी भगवंत मानतो, कुणी खुदा तर कुणी जिजस. प्रत्येकाच्या दैवी संकल्पना वेगळ्या असल्या तरी सामान्य भावना तीच आहे, ‘शरण आये हम तुम्हारे रक्षा करो भगवान’. याच भावनेतून ‘कोरोना’ विषाणूचे थैमान घालविण्यासाठी सर्व मतावलंबी आपापल्या इष्टदेवतेंच्या चरणी जात असल्याचे दिसून येत आहे. सरकारने सार्वजनिक सोहळे, गर्दी यांना मज्जाव केला असला तरी भक्तांची आस्था त्यावर भारी पडत असल्याचे दिसून येत आहे.भारत हा विविध मतावलंबीयांचा देश आहे आणि देशभरात वेगवेगळ्या शहरांत सर्वच जण आपापले जीवन जगत असतात. नागपुरातही हीच स्थिती आहे आणि त्यामुळेच येथे मंदिरे, गुरुद्वार, विहारे, मशीत, चर्च आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळायला लागले, तेव्हापासूनच राज्य शासनाने सजगतेची भूमिका घेतली आणि सिनेमा थिएटर्स, नाट्यगृहे, मॉल्स, बगीचे, शाळा, कॉलेजेस यांना बंद करण्याचा निर्णय घेतला तर सार्वजनिक सोहळे जसे विवाह, सभा, आंदोलने घेण्यावर सक्तीची बंदी केली आहे. अशात भिन्न भिन्न मतावलंबीयांची आराधना स्थळे मात्र बिनधोक सुरू आहेत. येथे येणारी भाविक मंडळीही आपल्या दैनिक दर्शन, पूजनासाठी येत आहेत. सीताबर्डी येथील श्रीगणेश टेकडी मंदिर, इलेक्ट्रिक मार्केट रोडवरील शनिमंदिर, वाठोडा येथील स्वामीनारायण मंदिर, मोठा ताजबाग, लहान ताजबाग, वर्धा महामार्गावरील साई मंदिर, नंदनवन येथील राधाकृष्ण मंदिर अशी सर्वच आराधना स्थळांवर भाविकांची नियमित गर्दी दिसून येत आहे.अशा प्रार्थनास्थळांवर येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनांकडून विशेष अशा कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. संरक्षण मास्क व सॅनिटायझरचा आधीच तुटवडा निर्माण झाल्याचे नवीनच संकट उद्भवले असताना, प्रार्थनास्थळांवर येणारा भाविक कुठल्याही चिंतेशिवाय असल्याचे दिसून येत आहे. संरक्षण व्यवस्था पुरविली जात नसली तरी खबरदारीचे आवाहन केले जात आहेत.प्रत्येक वेळेला खरबदारीच्या घोषणा - दीपक बोरगावकरप्रत्येकच जण आपापल्या परीने खबरदारी घेत आहे. संकट आल्यावर कुणालाही भगवंतच आठवतो आणि अशा वेळी भाविकांना दर्शनासाठी येण्यास मज्जाव केला जाऊ शकत नाही. शिवाय, बाजारातच संरक्षण प्रणालीचा तुटवडा भासत असल्याने देवळात दर्शन घेण्यास येणाऱ्यांना हात व पाय स्वच्छ धुण्याचे आवाहन केले जात आहे. शिवाय आरतीच्या पूर्वी व नंतर काळजी घेण्याचे संदेश प्रसारित केले जात असल्याची माहिती वर्धा महामार्गावरील साईमंदिरचे व्यवस्थापक दीपक बोरगावकर यांनी दिली.पंडित, मौलवी करत आहेत सृष्टीच्या सुरक्षेची याचनाबऱ्याच ठिकाणचे पुजारी व मौलवी भाविकांना कोरोना महामारीच्या काळात दक्षता बाळगण्याचे आवाहन करत असतानाच, सृष्टी रक्षणार्थ पंडित महामृत्युंजय मंत्राचा जप करत आहेत तर मौलवी कुरणातील आयते वाचत असल्याचे दिसून येत आहे. काही पुरोहितांनी सृष्टी संरक्षणार्थ महामृत्युंजय यज्ञ करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
नागपुरातील प्रार्थनास्थळे : आहे 'कोरोना' तरी भक्तांची 'आस्था' भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:56 PM
‘शरण आये हम तुम्हारे रक्षा करो भगवान’. याच भावनेतून ‘कोरोना’ विषाणूचे थैमान घालविण्यासाठी सर्व मतावलंबी आपापल्या इष्टदेवतेंच्या चरणी जात असल्याचे दिसून येत आहे. सरकारने सार्वजनिक सोहळे, गर्दी यांना मज्जाव केला असला तरी भक्तांची आस्था त्यावर भारी पडत असल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देलोकांचा विश्वास ‘देव तारी त्याला कोण मारी’