लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील ‘कोरोना’ निदान केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रासाठी मागील काही महिन्यांपासून तयारी सुरू होती व अखेर प्रयोगशाळेला ‘आयसीएमआर’ची मान्यता प्राप्त झाली. या केंद्रामुळे शहरात ‘कोरोना’ चाचण्यांचे प्रमाण वाढणार आहे.विद्यापीठाच्या राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्राच्या संचालिका डॉ. आरती शनवारे यांच्या नेतृत्वात प्रयोगशाळा उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. मंगळवारी या प्रयोगशाळेचा उद्घाटन समारंभ मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. उद्घाटक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर उपस्थित होते. तर नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे हेदेखील उपस्थित होते.प्रयोगशाळा उभारणीच्या कामाकरिता डॉ. आरती शनवारे यांच्यासमवेत डॉ. मनोज राय, डॉ. राजेंद्र काकडे, डॉ. अर्चना मून, डॉ. विजय तांगडे आणि डॉ. अभय देशमुख यांनी सहकार्य केले. केंद्राच्या नोडल अधिकारीपदी डॉ. निशिकांत राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वाणिज्य विभागात प्रयोगशाळेची स्थापनाअमरावती मार्गावरील विद्यापीठ परिसरातील वाणिज्य विभागाच्या एकाकी इमारतीतल्या चार खोल्यांमध्ये ही प्रयोगशाळा स्थापित करण्यात आली आहे. कोविड चाचण्यांकरिता आवश्यक सर्वच अद्ययावत उपकरणे येथे उपलब्ध आहेत. प्रयोगशाळेत चाचणीकरिता जिल्हा शल्य चिकित्सक व नोडल अधिकारी-कोविड-१९, नागपूर यांच्या कार्यालयातर्फे चार तंत्रज्ञ, दोन डेटा एन्ट्री ऑपरेटर, एक वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपूर विद्यापीठात ‘कोरोना’ निदान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 8:05 PM