- दोन लॉकडाऊन अन् १५ महिने : काही बंद पडले, काही संपण्याच्या मार्गावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंटरनेट कॅफे आणि इन्स्टिट्यूट्समधून इंटरनेटचे जाळे आणि त्याबद्दल शिक्षण सर्व स्तरापर्यंत पोहोचले. नेट सर्फिंग, इंटरनॅशनल घडामोडींसाठी नेट कॅफे हक्काचे केंद्र होते. एज्युकेशनल अपडेट्स, जाॅब प्लेसमेंट, अर्ज आदींसाठी या कॅफेंचे योगदान मोठे होते. ॲण्ड्राईड मोबाईलने जिथे प्रत्येकाच्या हातात इंटरनेटचे कनेक्शन २४ बाय ७ आले, अशा काळातही इंटरनेट कॅफे महत्त्वाची भूमिका बजावत होते, आहेत. मात्र, कोरोनाने गेल्या १५ महिन्यापासून या इंटरनेट कॅफेंचे नेटवर्क ब्रेक केले आहे.
शहराच्या वेगवेगळ्या भागात इंटरनेट कॅफे आणि इन्स्टिट्यूट्स मोठ्या प्रमाणात आहेत. या कॅफे व इन्स्टिट्यूट्समध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी नवनव्या तंत्रज्ञानाबाबतचे शिक्षण घेत असतात आणि आपल्या करिअरला वेग देत असतात. मात्र, मार्च २०२० पासून हे सगळे जागच्या जागी थांबले आहेत. कोरोना संक्रमणाच्या पहिल्या लाटेने तीन महिने लॉकडाऊनचा मार सोसल्यानंतर अनलॉक प्रक्रियेत सावरण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, फेब्रुवारी २०२१ पासून दुसऱ्या लाटेने थैमान घातले आणि गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊन प्रक्रियेत इतर क्षेत्रांसाेबतच इंटरनेट कॅफेही बंद पडले आहेत. सलगच्या लॉकडाऊनमुळे भाडे, इंटरनेट बिल, वीज बिल आणि इतर मेन्टेनन्सचा बोजवारा उडला आहे. अनेक कॅफे कायमची बंद पडली आहेत तर, अनेक कायमचे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
-----------------
कोरोनाने शिकवले इंटरनेट हाताळणे
शिक्षण, नोकरी, निविदा भरण्यासाठी अनेक जण इंटरनेट कॅफेंचा आधार घेत असतात. आपल्या हातून चूक राहू नये म्हणून कॅफेमधील तज्ज्ञांच्या हाताने ही कामे केली जातात. मात्र, कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन आणि इंटरनेट कॅफे बंद असल्याने आणि संक्रमणाच्या भीतीने अनेकांनी अनेक बाबी स्वत:च रिस्क घेऊन शिकून घेतल्या. अनेकांच्या हातात मोबाईल असल्याने इंटरनेटही प्रत्येकाजवळच असते. त्याचा परिणाम अनेकांना आता इंटरनेट कॅफेपर्यंत जाण्याची गरजच पडत नाही.
----------------
पर्यायही सगळेच बंद पडले
इंटरनेट कॅफेसोबतच माझे झेरॉक्स व प्रिंट सेंटरही आहे. पूर्वी दर दिवसाला वेगवेगळ्या मार्गे १५०० रुपयापर्यंत उत्पन्न होत होते. मात्र, लॉकडाऊनने सगळेच हिरावले. शिवाय, पर्याय म्हणून दुसरीकडे शिकवायला जात होतो. तेही बंद झाल्याने उत्पन्नच नाही. रुमचे भाडे, वीज बिल, मेन्टेनन्सवरच आता २० हजाराच्या जवळपास दर महिन्याचा खर्च होतो. आता तेही देता येत नाही.
- प्रशांत लिखार, नेटसिटी इंटरनेट कॅफे, तिरंगा चौक
----------------
इमर्जन्सी सर्व्हिस म्हणून सुरू ठेवायला हवे होते
अनेकांना शैक्षणिक, नोकरी व इतर गरजेच्या वेळी इंटरनेट कॅफेची गरज भासते. शिवाय, मोठ्या प्रमाणात प्रिंट हव्या असतात. मात्र, लॉकडाऊनमुळे अनेकांना अडचणी झाल्या. शिवाय, आमच्यासारख्यांचे तर दिवाळेच निघाले. १५ महिने विना रोजगार, विना पैसा कसे काढले, हे आमचे आम्हालाच ठाऊक. शिवाय, विद्यार्थीही गेले ते वेगळे.
- उमेश पाटील, उमेश कॉम्प्युटर, रामेश्वरी
----------------------
भाडे, किराणा आदींचा खर्च काढणे अशक्य
कॅफे बंद पडल्याने रुमचे भाडे आणि घरचा किराणा आणता येईल, अशीही स्थिती राहिली नाही. गेल्या पाच-सहा वर्षांपासून कॅफे चालवत आहे. मात्र, कोरोनाने तर उद्ध्वस्तच केले. ही भरपाई कशी निघेल, हे सांगता येत नाही. अनलॉकनंतरही मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे.
- चेतन वडे, ग्रीन सिटी इंटरनेट, मानेवाडा रिंग रोड
......................