१६ दिवसांनंतर कोरोनाने मृत्यूची नोंद
नागपूर : १६ दिवसांनंतर नागपूर जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत पावलेला संक्रमित रुग्ण जिल्ह्याच्या बाहेरचा होता आणि तो नागपुरात उपचार घेत होता.
यापूर्वी २७ ऑक्टोबर रोजी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. जिल्ह्याबाहेरील असलेल्या या रुग्णाच्या मृत्यूची नोंद नागपूर ग्रामीणमध्ये करण्यात आली होती. आज झालेल्या मृत्यूच्या नोंदीसह कोरोना मृतकांची संख्या १०,१२२ वर पोहोचली आहे. नागपूर शहरात साधारणत: दोन महिन्यांपासून कोरोना संक्रमणामुळे झालेल्या मृत्यूची नोंद झालेली नाही. ही एक समाधानकारक बाब आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात २८११ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात २२२६ नमुने शहरातील, तर ५८५ नमुने ग्रामीणचे आहेत. यातील शहरातून ५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण संक्रमितांची संख्या ४,९३,५०० झाली असून, ५ संक्रमित कोरोनामुक्त झाले आहेत. वर्तमानात २९ रुग्ण कोरोना संक्रमित असून, यातील २७ शहरांतील आणि दोन ग्रामीणचे आहेत. आतापर्यंत शहरात ५८९३, ग्रामीणमध्ये २६०४ आणि जिल्ह्याबाहेरतील १६२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात ३,४०,४०८, ग्रामीणमध्ये १,४६,२०२ तर जिल्ह्याबाहेरील ६८९० संक्रमित आढळले आहेत.
दीपावलीमुळे बाजारात प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे, नोव्हेंबर महिन्यात संक्रमण वाढण्याची शंका होती; परंतु नोव्हेंबर महिन्यातील १२ दिवसांत ४८ संक्रमित आढळले असून, एक मृत्यूची नोंद झाली आहे.
ॲक्टिव्ह - २९
कोरोनामुक्त - ४,८३,३४९
मृत्यू - १०,१२२
............