नागपूर : लॉकडाऊनमुळे मध्यम, लघु, सूक्ष्म आणि गृहउद्योगांवर संकट आले आहे. सर्व उद्योग पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी झटत आहेत. मोठ्या उद्योगांसाठी जुळलेले लघु व गृहउद्योगात रोजगाराचे संकट निर्माण झाले आहे. त्यातच खादी उद्योगाशी जुळलेले आणि स्वतंत्ररीत्या गृहउद्योग करणारे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा येथील उद्योजकांची उत्पादने कोरोना काळात न विकल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे. शिवाय अनेकांना रोजगाराचा सामना करावा लागत आहे.
विदर्भात गृहउद्योगाची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. अनेक महिला व पुरुष लोणची, पापड, तिखट, मसाला, शॉम्पू, मेंदी, अगरबत्ती, वॉशिंग पावडर आदी उत्पादने तयार करून रोजगार निर्मिती करतात. पण गृहउद्योगावर दीड वर्षांपासून कोरोनाचे ग्रहण लागले आहे. नोंदणीकृत आकडेवारीनुसार विदर्भात जवळपास २५०० हजारांपेक्षा जास्त गृहउद्योग आहेत. ही संख्या नागपुरात ५०० पेक्षा जास्त आहे. त्यापैकी ७५ टक्के युनिट बंद पडले आहेत.
खादी ग्रामोद्योगच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, खादी ग्रामोद्योगमुळे अनेक लहान-लहान लोकांना काम मिळत होते. त्यांचे रोजगाराचे साधन बनले होते. लहान उद्योजक म्हणून ते काम करीत होते. पण आता त्यांचे उद्योग बंद पडले आहेत. राज्य शासनाकडून काहीही मदत न मिळाल्याने महिलांचा रोजगार हिरावला आहे. पुन्हा काम सुरू करण्यासाठी त्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे.
गृहउद्योजक मंगेश शेंडे म्हणाले, कोरोना काळात तिखट, मसाल्यांची विक्री मंदावल्यामुळे व्यवसायाची साखळी तुटली आहे. अनलॉक झाले असले तरीही उद्योग रूळावर येण्यास वेळ लागेल. सध्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. दुकानदारांना जुन्याच किमतीत माल हवा आहे. मालाचे दर वाढल्याने दुकानदार ब्रॅण्डेड कंपन्यांचा माल ठेवत आहे.
प्राजक्ता दहीवाल म्हणाल्या, फरसाणचे पॅकेट तयार करण्याचा गृहउद्योग आहे. कोरोना काळात व्यवसाय बंद झाला. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या महिलांचा रोजगार हिरावला आहे. शिवाय आमची उलाढाल थांबली. नव्याने उद्योग सुरू करण्याची धडपड सुरू आहे. अनलॉकनंतर उद्योगाला पूर्वीचे दिवस येतील, अशी अपेक्षा आहे.
अतुल लांजेवार म्हणाले, फिनाईल, वॉशिंग पावडर, भांड्याचे पावडर निर्मितीचा गृहउद्योग आहे. कोरोना काळात दुकाने बंद असल्याने उत्पादन आणि विक्री बंद होती. त्यामुळे दहा जणांच्या रोजगारावर संकट आले. शिवाय आर्थिक फटका बसला. त्या काळात दुकानदारांनी ब्रॅण्डेड उत्पादनांची विक्री केली. अनलॉकनंतर निर्मिती सुरू केली आहे. विक्री पूर्ववत करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे.