नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - भक्कम तटबंदी भेदून कारागृहात शिरलेल्या कोरोनाला दाणादाण उडविण्याची पुन्हा संधी मिळू नये म्हणून राज्य कारागृह प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य कारागृह प्रशासनाचे प्रमुख, अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी) सुनील रामानंद यांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहात भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला.
कोरोनाची दुसरी लाट शहराशहरात धडक देत आहे. बेसावध नागरिक आणि गर्दीला लक्ष्य करणाऱ्या कोरोनाने कारागृहातही धडक दिली आहे. विशेष म्हणजे, गुन्हेगारांची वस्ती मानल्या जाणाऱ्या राज्यातील ठिकठिकाणच्या कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी कोंबले जात असल्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त वाढला आहे. नागपुरात गेल्या वर्षी २३३ कैद्यांना आणि ७६ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला होता. अशीच स्थिती राज्यातील विविध कारागृहात होती. ती ध्यानात घेऊन गेल्या वर्षी १० हजारांवर कैद्यांना जामीन देऊन कारागृहाबाहेर सोडण्यात आले होते. या कैद्यांनी बाहेर पडताच राज्यातील विविध शहरात अक्षरश: हैदोस घातला. कारागृहातील सुटल्याच्या तिसऱ्याच दिवशी एका गुन्हेगाराने नागपुरातील पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली होती. मोकाट सुटलेल्या या गुंडांनी आपले मूळ रूप दाखवणे सुरू केल्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रचंड क्राईम रेट वाढला होता. नाकापेक्षा मोती जड व्हावा तसा हा प्रकार सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर पोलिसांचीही डोकेदुखी वाढवणारा ठरला होता. आता पुन्हा कोरोना कारागृहात शिरला आहे. नागपुरात १० कैदी आणि ४ कर्मचाऱ्यांना कोरोनाने कवेत घेतले आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. ‘सोडले तर चावते अन् धरून ठेवले’ तर धोका निर्माण करते, असा हा पेच असल्याने कारागृहात कोरोना हैदोस घालणार नाही, यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाचे प्रमुख एडीजी रामानंद यांनी प्रत्यक्ष दाैरा करून उपाययोजना आणि उपलब्ध साधन सुविधांचा आढावा घेणे सुरू केले आहे. गुरुवारी त्यांनी नागपुरात येऊन स्थानिक प्रशासनाशी कारागृह आणि कोरोनाबाबतची स्थिती जाणून घेतली. त्यानंतर उपाययोजनांबाबत आवश्यक ते निर्देश दिले.
मध्यवर्ती कारागृहाची स्थिती
कैद्यांची क्षमता - १७००
सध्यस्थितीतील कैद्याची संख्या - २२०० ते २३००
गेल्या वर्षी बाधित कैदी - २३३
यावर्षी (नवी लाट) - १०
गेल्यावर्षी बाधित कारागृह कर्मचारी - ७६
यावर्षी - ०४
कोणत्याच कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासन सतर्क आहे. आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. नागपुरात उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सुनील रामानंद
अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) पुणे.