मार्च २०२० पासून सुरू झालेला कोरोना महामारीचा प्रकोप अद्याप कायम आहे. पहिली लाट संपत नाही तोच या वर्षी फेब्रुवारीपासून दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले. गेल्या वर्षीच्या तुलनेत मृत्यूचा आकडाही वाढला. निव्वळ कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा या वर्षी ५००० च्या वर गेला. विशेष म्हणजे हा आकडा केवळ साडेचार महिन्यांचा म्हणजे २० मे २०२१ पर्यंतचा आहे. २०२० च्या मार्चपासून ते डिसेंबरपर्यंतच्या आकड्यांपेक्षाही तो अधिक आहे. २०१९ मध्ये सर्वसाधारण १८ हजारांच्या जवळपास मृत्यूंची नोंद करण्यात आली. २०२० मध्ये हा आकडा २२ हजारांवर पोहोचला. यामध्ये कोरोनाने झालेल्या मृत्यूंचाही समावेश आहे. मात्र या वर्षी चारच महिन्यांत सर्वसाधारण व कोरोना मिळून मृत्यूंचा आकडा १२ हजारांच्या वर गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
उल्लेखनीय म्हणजे गेल्या दोन वर्षांत जन्माचे प्रमाणही घटले आहे. २०१९ मध्ये ५३,९०७ मुलांचा जन्म झाला होता. २०२० मध्ये त्यात ९,०७१ ची घट झाल्याचे दिसून येते. या वर्षी ४४,९७८ बालकांचा जन्म झाला. यामध्ये २३,२२८ मुले व २१,७५० मुलींचा समावेश आहे. २०१९ च्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण ९५१ वरून ९३६ वर घसरल्याचे दिसून येते. २०२१ मध्ये जन्म प्रमाणात आणखी म्हणजे ३५ टक्क्यांनी घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिल २०२० मध्ये ३,२०७ जन्माच्या तुलनेत २०२१ च्या एप्रिल महिन्यात २,१५१ बालकांच्या जन्माची नोंद करण्यात आली.
तज्ज्ञांच्या मते जन्मदर कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत व ती कोरोनाशी संबंधित आहेत. एकतर गेल्या दीड वर्षात लग्नांचे प्रमाण कमालीचे घटले. ५० टक्केंच्या वर लग्न रद्द करण्यात आली किंवा पुढे ढकलण्यात आली. विशेष म्हणजे ज्यांचे लग्न झाले त्यांनीही संसर्गाच्या भीतीपायी पाळणा लांबविला. रुग्णालयातील भीषण परिस्थितीत गैरसोयीचा विचार करता प्रेग्नेंसी टाळण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे जन्माचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
लग्नाची संख्याही घटली
दरम्यान, गेल्या दीड वर्षापासून लग्नांची संख्याही घटली आहे. मार्च २०२० आलेल्या काेराेनाच्या पहिल्या लाटेनंतर जूनपर्यंत सर्व कारभार ठप्प राहिले. त्यानंतर काहीसी शिथिलता आली व रखडलेल्यांनी लग्न उरकून घेतले. मात्र फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा लग्न समारंभ खाेळंबले. सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात जवळपास ५००० लग्न झाल्याची नाेंद आहे. हा आकडा दरवर्षीच्या तुलनेत २५ टक्केच म्हणावा लागेल.
वर्ष जन्म मृत्यू
२०१९ ५३९०७ १८४३१
२०२० ४४९७८ २२७४३
२०२१ ०० ००