लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. बुधवारी ३,५२८ रुग्ण व ३१ मृत्यूची नोंद झाल्याने, हा कोरोनाचा प्रकोप असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा या ११ महिन्यांच्या काळात सर्वाधिक रुग्णांची नोंद १९ सप्टेंबर रोजी झाली होती. ४,८०० रुग्ण आढळून आले होते, परंतु या संख्येपर्यंत पोहोचण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागला होता, परंतु आता चार महिन्यांतच या आकड्याच्या जवळपास रुग्णसंख्या पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागपुरात आज सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच हजाराचा टप्पा ओलांडून रुग्णसंख्या १,१८१ पोहोचली. १० रुग्णांचे बळीही गेले. अमरावतीत ८०२ रुग्ण व १० मृत्यूची नोंद झाली. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढताना दिसून येत आहेत, तर नागपूर विभागात नागपूर व वर्धा सोडल्यास इतर चार जिल्ह्यात ३०च्या खाली रुग्णसंख्या आहेत. नागपूर विभागात १,४४० रुग्ण व १३ मृत्यू तर अमरावती विभागात २,०८८ रुग्ण १८ मृत्यूची नोंद झाली.
विदर्भातील बुधवारची स्थिती
जिल्हा रुग्ण ए. रुग्ण मृत्यू
नागपूर ११८१ १४५७१५ १०
गोंदिया १० १४३६५ ००
भंडारा १४ १३५४८ १
गडचिरोली ९ ९४८२ ०
वर्धा १९२ ११६८४ २
चंद्रपूर ३४ २३४७१ ०
अमरावती ८०२ ३१९२५ १०
यवतमाळ २१५ १६५०१ १
अकोला ३८५ १४८०३ २
बुलडाणा ३६८ १७२८० ४
वाशिम ३१८ ८२४९ १