लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील वर्षी ग्रामीण भागामध्ये शिरकावही न झालेला कोरोना या वेळी दुसऱ्या लाटेमध्ये वेगाने पसरत आहे. शहरासोबतच गावांमध्येही कोरोना संक्रमितांचा आकडा वाढत आहे. यामुळे गावखेड्यांमध्ये दहशतीचे आणि भीतीचे वातावरण आहे. शहरी भागांसारख्या सुविधा आणि जनजागृती ग्रामीण भागात नाहीत. यामुळेच ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा स्फोट झाल्यासारखी स्थिती असल्याचे मत व्यक्त होत आहे.
...
गृहविलगीकरणातून धोका
खेड्यांमध्ये गृहविलगिकरण होत असले तरी त्यातूनच अधिक धोका आहे. शौचालय एकच असल्याने त्याचा एकत्रित होणारा वापर, रुग्णाला दिले जाणारे अन्न व भांड्यांचा कुटुंबातील सदस्यांमध्ये होणारा वापर, मास्कचा मर्यादित वापर, मास्क वापरण्याऐवजी केवळ रूमालाचा वापर, मास्क वापरामध्ये न घेतली जाणारी खबरदारी या बाबी गृहविलगीकरणामध्ये अधिक धोकादायक ठरत आहेत.
...
तपासणीमध्ये टाळाटाळ
कोरोनाची लक्षणे आढळल्यावर तपासणीमध्ये होणारी टाळटाळ हे यातील मुख्य कारण आहे. साधारण ताप समजून दुर्लक्ष केले जाते. अनेक रुग्ण अंगावर ताप काढतात. संबंधित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असूनही लक्षात न आल्याने कुटुंबात तसेच शेजारात संसर्ग पसरतो. तपासणीनंतर विलंबाने येणारे रिपोर्ट, उपचारामध्ये येणारे अडथळे, या काळात ग्रामीण भागातील लोकांना तालुका स्तरावर उपचारासाठी पोहचण्यातील अडथळे, तालुका स्तरावर असणाऱ्या अपुऱ्या सुविधा हे सुद्धा वेगाने संसर्ग वाढण्याचे कारण आहे.
...
अपुऱ्या सुविधा
ग्रामीण भागामध्ये सुविधांचा प्रचंड अभाव आहे. सॅनिटायजरचा वापर फार कमी होतो. अनेकजण सॅनिटायजर वापरतच नाहीत. ग्रामपंचायतींकडून जंतूनाशकाची फवारणही होत नाही. बाहेरून आल्यावर स्वच्छ होण्याकडेही फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. बाहेरून वस्तू खरेदी करून आणल्यावर सॅनिटाईज न करता होणारा वापरही तेवढाच धोकादायक आहे.
...
असे आहे प्रमाण
दिनांक : जिल्ह्यात तपासण्या : ग्रामीणमधील पॉझिटिव्ह : एकूण रुग्ण
१७ एप्रिल : २९,०५३ : २४ टक्के : ६,१९४
१८ एप्रिल : २६,७९२ : २६.५ टक्के : ६,९५९
१९ एप्रिल : १७,९७८ : ३५.४ टक्के : ७,१०७
२० एप्रिल : २६,०२८ : २६.४ टक्के : ६,३४०
२१ एप्रिल : २४,१६३ : -- : ७,२६६
...