लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे पितळ उघडे पाडले असून, वैद्यकीय क्षेत्राने चिंतन करण्याची गरज असल्याचे मत कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, दिल्लीचे माजी अधिष्ठाता व आयोडिन मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री डॉ. चंद्रकांत पांडव यांचा सत्कार डॉ. मिश्रा यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व वनराई फाउंडेशनच्यावतीने शंकर नगर येथील राष्ट्रभाषा संकुलाच्या शंकरराव देव कक्षात करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ज्ञ शंकरराव अग्निहोत्री होते तर व्यासपीठावर फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, पब्लिक हेल्थ फाउंडेशनचे संचालक डॉ. संजय झोडपे उपस्थित होते.
आपल्याकडे कम्युनिटी मेडिसीन हा विषय कायम दुर्लक्षित राहिला आहे. त्याचे दुष्परिणाम कोरोना काळात दिसून आले. त्यामुळेच, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ करण्याची गरज निर्माण झाली आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील उणिवांची कारणे शोधण्याची गरज आहे. बाहेरील प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत आपल्याकडील वैद्यकीय सुविधा उत्तम नसल्याने, नागरिकांना या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागल्याचे डॉ. वेदप्रकाश मिश्रा यावेळी म्हणाले. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन नितीन जतकर यांनी केले तर आभार नीलेश खांडेकर यांनी मानले.
...............