नागपूर : फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांमध्ये वाढ होताच आमदार निवासातील कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी होऊ लागली होती. दरम्यानच्या काळात पालकमंत्री नितीन राऊत यांनी घोषणाही केली. परंतु सेंटर सुरू होत नव्हते. अखेर सोमवारी मुहूर्त निघाला. ‘बी’ व ‘सी’ इमारतीत काम सुरू असल्याने ३५० पैकी १५० खाटांवरून ‘कोविड केअर सेंटर’ला सुरुवात करण्यात आली.
कोरोनाच्या सुरुवातीला बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांना क्वारंटाईन केले जात होते. यासाठी प्रशासनाने आमदार निवास, वनामती, रविभवन, पाचपावली पोलीस क्वॉर्टर, सिम्बॉयसिस व व्हीएनआयटी येथे सोय केली होती. परंतु नंतर बाधितांची संख्या वाढल्याने व रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्याने लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आमदार निवासाला कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) रूपांतरित केले. त्यानंतर काहीच दिवसांनी पाचपावली पोलीस क्वॉर्टर, वनामती व व्हीएनआयटीतही हे सेंटर सुरू करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात तर हे सर्व सेंटर फुल्ल झाले होते. परंतु नोव्हेंबर महिन्यात रुग्णसंख्या कमी होताच सेंटर ओस पडू लागले. अखेर डिसेंबरमध्ये आमदार निवास व वनामती येथील ‘सीसीसी’ बंद केले. केवळ पाचपावली व व्हीएनआयटी हे दोनच सेंटर सुरू होते.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. घरी होम आयसोलेशनची सोय नसतानाही अनेक बाधित रुग्ण घरी राहू लागले. परिणामी, घरातच कोरोनाचा फैलाव वाढू लागला. १३ मार्चपासून दैनंदिन रुग्णांची संख्या २ हजारावर जाऊ लागल्याने १५ मार्च रोजी पालकमंत्री नितीन राऊत यांनी आमदार निवासातील ‘सीसीसी’ सेंटर सुरू करण्याची घोषणा केली. परंतु या सेंटरची जबाबदारी घेण्यास मनपा व जिल्हाधिकारी कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवीत होते. परिणामी, सेंटर सुरू होण्यास आठवडाभराचा कालावधी लागल्याचे समजते. सध्या आमदार निवासातील काही खोल्यांचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे जवळपास ३५० पैकी १५० खाटा उपलब्ध झाल्या आहेत. लवकरच उर्वरित खाटा उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.