सुमेध वाघमारे
नागपूर : विदर्भात रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला आहे. १५ दिवसात २२ हजार ३३४ रुग्णांची नोंद झाली आहे. यावरून दररोज सरासरी १५००वर रुग्ण आढळून येत आहे. विशेष म्हणजे, नागपूर, अकोला, चंद्रपूर, अमरावती व गोंदिया जिल्ह्यात झपाट्याने रुग्ण वाढताना दिसून येत आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूची संख्या कमी आहे. आतापर्यंत ११ मृत्यूची नोंद झाली आहे.
विदर्भातील ११ ही जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेपासून रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. डिसेंबर २०२१ मध्ये ५०च्या आत असलेली दैनंदिन रुग्णसंख्या १ जानेवारी रोजी ८४ झाली. त्यानंतर ५ जानेवारी रोजी ६०७ तर १० जानेवारी रोजी दुपट्टीने वाढ होऊन १ हजार ४५० तर, १५ जानेवारी रोजी ३ हजार ९२२ वर पोहचली. १५ दिवसांत ९७.८५ टक्क्याने रुग्णांत वाढ झाली. वेगाने वाढत असलेल्या या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.
-नागपुरात १२,७३८ तर अकोला जिल्ह्यात १,५९१ रुग्ण
नागपूर जिल्ह्यात मे महिन्यानंतर रुग्णसंख्येने शनिवारी उच्चांक गाठला. तब्बल २ हजार १५० रुग्णांची भर पडली. मागील १५ दिवसांत नागपूर जिल्ह्यात १२ हजार ७३८ रुग्ण व ६ मृत्यूची नोंद झाली. नागपूर नंतर याच दिवसात सर्वाधिक रुग्ण अकोला जिल्ह्यात आढळून आले. १ हजार ५९१ रुग्ण व १ मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातही रुग्ण वाढताना दिसून येत आहे. १ हजार ५७१ रुग्ण व २ मृत्यूची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यात १ हजार ३९० रुग्ण तर गोंदिया जिल्ह्यात १ हजार १२५ रुग्णांची नोंद झाली. उर्वरित बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात हजाराच्या आत रुग्ण आहेत.