नागपूर : कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत सेवा संलग्न करण्यात आलेल्या शिक्षकांना विमा सुरक्षेचा लाभ मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. विशेष म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत शासनाने ज्या शिक्षकांची सेवा अधिग्रहित केली होती, त्यांचे प्रस्ताव पाठवायला सांगितले होते. जानेवारीनंतर विम्याच्या सुरक्षेपासून शिक्षकांना वंचित ठेवले. मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. अनेक शिक्षक बाधित झाले आहेत. शासनाने सेवा अधिग्रहित केलेल्या ८ शिक्षकांचा यात मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
मागील वर्षभरापासून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकांच्या सेवासुद्धा कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत संलग्न करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच लागू करण्यात आले. त्याप्रमाणे मागील वर्षभरात या मोहिमेत काम करताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांच्या विमा कवचचा लाभ देण्यात आला; परंतु शिक्षकांच्या कुटुंबियांना मात्र या विम्याचा लाभ मिळाला नाही.
- दोन शिक्षकांचे प्रस्ताव प्रलंबित, इतरांचे प्रस्तावही नाही
जि.प. नागपूरअंतर्गत कार्यरत कोरोना मोहिमेत कार्यरत असताना दुर्दैवाने मृत्यू झालेल्या कृष्णा टिकले पं.स. उमरेड व मनोहर चौधरी पं.स. कामठी या दोन शिक्षकांचे विमा लाभाबाबतचे प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी जि.प. नागपूरकडून शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले आहेत; परंतु ते अद्याप प्रलंबित आहेत. दुसरीकडे या मोहिमेत आणखी अनेक शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे; परंतु जि.प.च्या शिक्षण विभागाकडून पं.स.कडून त्यांचे प्रस्तावच मागितले नसल्याची माहिती आहे.
- विमा कवच लागू केले नसल्यामुळे या मोहिमेत कार्य करणाऱ्या शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना असून, त्यांचे कुटुंबीय भयभीत आहे. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत काम करणाऱ्या शिक्षकांना विमा कवच लागू करून या मोहिमेत मृत्यू पावलेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना या विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांच्यासह दिनकर उरकांदे, विलास काळमेघ, राजू बोकडे, सुरेश श्रीखंडे, नीळकंठ लोहकरे, प्रकाश सव्वालाखे, मीनल देवरणकर, पुष्पा पानसरे, कल्पना इंगळे, नंदकिशोर वंजारी, अशोक बांते, दिगंबर ठाकरे, अनिल वाकडे, श्रीकृष्ण भोयर, शैला भिंगारे, सविता राऊळकर, सुनीता कठाणे, सुनीता हिंगे आदींनी शिक्षणमंत्र्यांना केली आहे.