लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चीनमधील वुहान शहरातून पसरून ‘कोरोना व्हायरस’ने जगभरात दहशत निर्माण केली आहे. भारतासह आता नागपुरातही या विषाणूच्या रुग्णाचा शिरकाव झाला आहे. दिवसेंदिवस या रुग्णांत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच सोशल मीडियावर सुचविल्या जाणाऱ्या प्रतिबंधक उपायांमुळे गोंधळात भर पडली आहे.‘लोकमत’ने या विषयी शहरातील वरिष्ठ तज्ज्ञांशी संवाद साधला असता त्यांनी कोरोनाला घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले. त्यांच्यानुसार, चीनच्या तुलनेत चीनच्या बाहेर याचा मृत्युदर ०.२ टक्के आहे. जर १ हजार रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली तर ९९८ रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत. यामुळे नागपूरकरांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये.सर्वाधिक विषाणूंचा प्रादुर्भाव चीनमधून-डॉ. दंदे
डॉ. पिनाक दंदे म्हणाले, सर्वाधिक विषाणूंचा प्रादुर्भाव चीनमधूनच झाला. साधारण ७५ टक्के विषाणू पसरण्याचे स्थान चीन होते. तथे कमी शिजवलेले, कच्चे मांस खाण्याची प्रथा आहे. त्यामुळे प्राण्यांमधून या रोगाचा मानवामध्ये प्रादुर्भाव झाला. सध्या या विषाणूवर औषध नाही. रोग पसरण्याची गती फार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोणी नागरिक कोरोना रुग्णासोबत किंवा त्यांच्या सानिध्यातून आले असेल आणि त्यास लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सर्वांनी मास्क घालणे आवश्यक नाही. मात्र ज्यांना खोकला, सर्दी आहे त्यांनी मास्क घालावे.स्वाईन फ्लूच्या तुलनेत कोरोनाचा मृत्युदर कमी-डॉ. अरबट
डॉ. अशोक अरबट म्हणाले, यापूर्वी २०१० ते २०१९ या वर्षात स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून आले. सुरुवातीला स्वाईन फ्लूचा मृत्युदर हा ११ ते १३ टक्के होता. म्हणजे १०० पैकी ११-१३ रुग्णांचा मृत्यू होत असे. आता स्वाईन फ्लूचा रुग्ण सहजतेने बरा होतो. महाराष्ट्रात दहा वर्षात स्वाईन फ्लूचे २२,८६० रुग्ण आढळले. त्यापपैकी ३,४४७ रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रमाण ११ टक्के आहे. या सगळ्यांची कोरोना व्हायरसच्या मृत्युदराशी तुलना केली तर कोरोनाचा मृत्युदर कमी आहे. दक्षिण चीनमधून उगम पावलेल्या ‘सार्स’चा मृत्युदर १० टक्के होता. तर ‘मिडल ईस्ट सिन्ड्रॉम’चा मृत्युदर ३४ टक्के होता. कोरोना व्हायरसचा मृत्युदर फार कमी आहे.कोरोना होऊनही ९८ टक्के लोक बरे होतात- डॉ. देशमुख
डॉ. जय देशमुख म्हणाले, आपल्या देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. या रोगाच्या तुलनेत, डेंग्यू, स्वाईन फ्लू, ‘हेपेटायटीस-बी’ हे रोग आपल्याकडे धोकादायक ठरले आहेत. अद्यापही ९५ टक्के व्हायरसवर औषधे नाहीत. व्हायरसमुळे होणाºया मृत्यूपेक्षा कोरोनाचा मृत्युदर कमी आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी शंभरातील २ किंवा ३ रुग्णांचा रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. कोरोना होऊनही साधारण ९८ टक्के रुग्ण बरे होतात. म्हणजेच, योग्य काळजी घेतली तर रुग्ण हमखास बरा होतो. प्रतिबंधात्मक उपाय करण्यास व सावधगिरी बाळगण्यास प्राधान्य दिले पाहिजे. आपणास कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालाय असे वाटले तर तत्काळ डॉक्टरांकडे जावे. जसजसे उन्ह वाढेल तसतसे या विषाणूच्या रुग्णांची संख्याही कमी होईल.दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहा - डॉ. तायडे
डॉ. परिमल तायडे म्हणाले, कोरोना विषाणूचा मृत्युदर निश्चितच इतर विषाणूंपेक्षा कमी आहे. यामुळे घाबरून जाऊ नका. परंतु सोशल मीडियावर या रोगाला घेऊन ज्या अफवा पसरविल्या जात आहेत, किंवा दिशाभूल केली जात आहे त्यापासून निश्चितच सावध राहायला हवे. या रोगावर प्रतिबंधात्मक औषधी किंवा ठराविक उपचार नाही. परंतु यांच्या लक्षणांवर करण्यात येणाºया औषधोपचाराने रुग्ण बरे होतात. आपल्याकडे एकेकाळी स्वाईन फ्लू खूप वाढला होता. त्याची भीती ‘कोरोना’मधून दिसून येणे हे साहजिकच आहे. मात्र, लोकांनी सावधगिरी बाळगली तर या रोगाला दूर ठेवणे सहज शक्य आहे. या ‘व्हायरस’विरुद्ध लढण्यासाठी नागपुरातील डॉक्टर सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.गर्दीच्या ठिकाणी रुमालाचा मास्क वापरा‘एन-९५’ मास्क हा रुग्ण व त्याच्या जवळच्या नातेवाईक व त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांनीच वापरावा. ज्यांना गर्दीच्या ठिकाणी जावयाचे आहे अथवा आजारी आहेत त्यांनी रुमालास अथवा कापडास स्वच्छ धुऊन त्याचा मास्कसारखा वापर करावा. हाताचा नाक-तोंड-डोळे यांना थेट स्पर्श टाळला पाहिजे आणि मास्कमुळे हे टाळता येईल. सोबतच सॅनिटायजरचा वापर करावा अथवा साबणाने २० सेकंदांपर्यंत हात धुणे आवश्यक आहे.जागतिक साथीचे रोग मृत्युदरमिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिन्ड्रॉम ३४ टक्केसिव्हियर अॅक्युट रेस्पि. सिन्ड्रॉम (सार्स) १० टक्केस्वाईन फ्लू (भारत) ७ ते ८ टक्केकोरोना व्हायरस २ ते ३ टक्के (चीनमध्ये) ०.२ टक्के (चीनच्या बाहेर)-यांना धोका संभवतो...
- रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे
- रक्तदाब, मधुमेहादी रोगाचे रुग्ण
- हृदयरोग, फुफ्फुसाच्या आजारांचे रुग्ण
- लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक
- अन्य आजारांनी ग्रसित व्यक्ती
-ही काळजी घ्यावी...
- हस्तांदोलन करण्यापेक्षा नमस्कार करा
- वारंवार तोंडाला हात लावू नका
- लावायचे असल्यास स्वच्छ धुऊन लावा
- मांस चांगले शिजवावे
- सर्दी किंवा खोकला असेल तर मास्क किंवा रुमाल बांधावा
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे
- सोशल मीडियावरील माहितीपासून सावधान