लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांत आतापर्यंत १६१४ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत ९३,२४६ रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी ग्रामीण भागात २५९८ रुग्णांची भर पडली, तर २० रुग्णांचा मृत्यू झाला. कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण केंद्राअभावी ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांवर उपचार मिळत नसल्याने दिवसागणिक मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
वाढती रुग्णसंख्या आणि पर्याप्त आरोग्य सुविधेच्या अभावामुळे आता आरोग्य यंत्रणाच ऑक्सिजनवर आली आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्युसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.