लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने, वाहन आणि घर खरेदी शुभ मानली जाते. सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, वाहन बाजार, बांधकाम क्षेत्र या सर्व बाजारपेठांमध्ये या दिवशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. यंदा मात्र या बाजारपेठेवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे नागपुरात जवळपास ५०० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.यंदा मात्र या बाजारपेठांवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. राज्यात टाळेबंदी असल्याने सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत.सोने खरेदी शुभगुढीपाडव्याला सोने खरेदी शुभ मानली जाते. नागपुरात सोन्याची लहानमोठी जवळपास १५०० पेक्षा जास्त दुकाने आणि शोरूम आहेत. या दिवशी सोने-चांदी मार्केटमध्ये १०० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल होते. पण संपूर्ण खरेदी-विक्री बंद राहिल्याने कुठलाही व्यवहार झाला नाही. त्यामुळे सराफांना आर्थिक फटका बसला आहे. गुढीपाडव्याला खरेदी-विक्री बंद राहण्याची दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१७ मध्ये सराफा विक्रेत्यांनी ४२ दिवसांचा बंद ठेवला होता. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या टाळेबंदीला आमचे समर्थन असल्याचे मत सोना-चांदी ओळ कमिटीचे सचिव राजेश रोकडे यांनी सांगितले.वाहन मार्केटमधील १०० कोटींची उलाढाल ठप्पगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दुचाकी आणि चारचाकी वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यावर्षी कोरोनामुळे टाळेबंदी असल्याने खरेदी-विक्रीच बंद आहे. डॉ. पी.के. जैन म्हणाले, गेल्या तीन महिन्यापासून आॅटोमोबाईल क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. बीएस-६ ची वाहने बाजारात येणार असल्याने बीएस-४ च्या वाहनांचे उत्पादन जानेवारीपासून बंद आहे. यामुळे हे मार्केट ठप्प आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला जवळपास ५ हजार दुचाकी आणि २ हजार चारचाकी वाहनांची विक्री होते. यावर्षीही तेवढ्याचा विक्रीची अपेक्षा होती. पण कोरोनामुळे विक्री थांबली.बांधकाम क्षेत्राला कोट्यवधींचा फटकाकेंद्र आणि राज्य सरकारच्या करकपातीमुळे बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस आले होते. लोकांची फ्लॅट, प्लॉट आणि डुप्लेक्सची खरेदी वाढली होती. रजिस्ट्री शुल्कात एक टक्के कपात केल्याने लोकांचा घर खरेदीकडे कल वाढला होता. गुढीपाडव्याला घर खरेदीसाठी चांगला मुहूर्त आहे. बिल्डर्सची चांगली तयारी होती. पण कोरोनामुळे या क्षेत्रात पुन्हा मंदी आली आहे. एक महिन्यापासून घरासाठी कुणाही विचारणा करीत नाही. त्यामुळे बांधकाम क्षेत्र पुन्हा मंदीत आहे. कोरोनामुळे दुहेरी मार पडला आहे. या क्षेत्राला पुन्हा शासनाच्या मदतीची गरज असल्याचे मत क्रेडाई नागपूर चॅप्टरचे सचिव गौरव अगरवाला यांनी व्यक्त केले.बँकांच्या कर्जाचा बोजाकोणताही व्यवसाय वा प्रकल्प सुरू करताना व्यापाऱ्यांना बँकांकडून कर्ज घ्यावे लागते. पण अन्य कारणाने वा कोरोना व्हायरसमुळे व्यापार वा उद्योग मंदीत आल्यास कर्ज आणि त्यावरील व्याजाची हप्तेवारी वाढत जाते. अशा परिस्थितीत व्यापारी वा उद्योजक खचून जातो. अशावेळी शासनाने प्रोत्साहनपर योजना राबविण्याची गरज असल्याचे अगरवाला म्हणाले.
कोरोनाचा गुढीपाडव्याला फटका : ५०० कोटींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 12:41 AM
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने, वाहन आणि घर खरेदी शुभ मानली जाते.कोरोनामुळे नागपुरात जवळपास ५०० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
ठळक मुद्देसोने-चांदी, वाहन, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठा बंद