लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येक व्यक्ती आपल्या इष्ट देवताला प्रसन्न करण्यासाठी, सुख-समृद्धीसह श्रद्धेपोटी देवपूजा करून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र आता कोरोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी कापूरचा उपयोग होत असल्याने लोकांकडून खरेदी वाढली आहे. कापराच्या उपयोगाची माहिती सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. त्यामुळेच ठोकमध्ये प्रति किलो ७५० रुपये भाव असलेले देशी (दगड्या) कापूरचे भाव किरकोळमध्ये १४०० रुपये किलोवर पोहोचले आहे. दुकानदारही मागणीनुसार भाव वाढवून नफा कमवीत आहेत.कापराच्या सुगंधाने जीवाणू, विषाणू, लहान कीटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर राहतात, असे वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे. याशिवाय कापराच्या सुगंधाने मनात एक नवचैतन्य निर्माण होते. सर्दी-पडसे व्हायची लक्षणे असताना रुमालात ३-४ कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दी-पडसे होत नाही, असे आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून लोकांनी कापराचा उपयोग करणे सुरू केले आहे. तसेच कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.खोकल्याकरिता आयुर्वेदिक कंपन्या कापराचा उपयोग करतात. त्यामुळे कापूर संरक्षणकर्ता असल्याचा समज लोकांमध्ये आहे. भारतीय मानसिकतेनुसार लोकांची खरेदी वाढली आहे. अनेकजण कापूर रुमालात ठेवून प्रतिबंधक उपाय म्हणून गर्दीच्या ठिकाणी सुगंध घेत आहेत. याच कारणामुळे विक्री वाढली आहे.कापूर उत्पादक नीलेश सूचक म्हणाले, कापरचा सीझन जून-जुलैपासून दिवाळीपर्यंत असतो. तेव्हा भाव कमी-जास्त होत असतात. पण आता कोरोना व्हायरसमुळे बाजारपेठेत मागणी असल्याने आणि भाव वाढल्याचे ऐकत आहे. पण उत्पादकांकडे मागणी वाढली नाही. ठोकमध्ये खुला देशी (दगड्या) कापराचे भाव ७५० रुपये किलो तर डबीत पॅकिंग छोट्या वड्याचा (टॅबलेट) कापूर ६९० रुपये किलो आहे. किरकोळमध्ये दीडपट भावात नेहमीच विक्री होते. कदाचित मागणीमुळे दुकानदार डबीवरील प्रिंटिंगच्या भावात अथवा जास्त भावात विक्री करीत असेल, पण त्याची अधिकृत माहिती नाही. पूर्वी चिकनगुनिया आजारात डासांचा प्रार्दुभाव थांबविण्यासाठी लोकांनी कापराचा उपयोग जास्त प्रमाणात केला होता.कापूर उद्योगाचा लघु उद्योगात समावेश होतो. नागपुरात पॅकिंग करून कापूर विकणारे १५ उत्पादक आहेत. आता प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुका स्तरावरही उत्पादक वाढले आहे. मध्यतंरी कच्च्या मालाचे भाव वाढल्याने भाव ११०० रुपयांवर पोहोचले होते.
कोरोनामुळे कापराचे भाव वाढले; लोकांची खरेदी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:51 AM
कापराच्या उपयोगाची माहिती सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. त्यामुळेच ठोकमध्ये प्रति किलो ७५० रुपये भाव असलेले देशी (दगड्या) कापूरचे भाव किरकोळमध्ये १४०० रुपये किलोवर पोहोचले आहे.
ठळक मुद्दे सुगंधाने जीवाणू, विषाणू नष्ट होत असल्याचा लोकांचा समज