नागपूर : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आजार धडधाकट व्यक्तींचाही बळी घेत आहे. या काळात कधी काय होईल, याचा नेम राहिला नसल्याने मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वारसदारांमध्ये संपत्ती वाटपावरून वाद होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.
मृत्युपत्र एक कायदेशीर दस्तऐवज असून त्यात मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या संपत्तीचा गोषवारा असतो. तसेच, त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर संबंधित संपत्तीचा कुणाला कसा वाटा द्यायचा, या बाबी स्पष्ट केलेल्या असतात. त्यामुळे वारसांमध्ये संपत्तीवरून होणारा ताणतणाव टळतो. करिता, कोरोना काळात नागरिकांना मृत्युपत्र करून ठेवण्याची आवश्यकता भासायला लागली आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास आपल्यामागे वारसांचे काय होईल, हा प्रश्न त्यांना सतावतो आहे. त्यामुळे मृत्युपत्र करून संपत्तीचे इच्छेप्रमाणे वाटप केले जात आहे.
नागरिकांच्या प्रतिक्रिया
वारसदारांमधील वाद टाळण्याचा प्रयत्न
कुटुंब प्रमुख्याच्या मृत्यूनंतर वारसदारांमध्ये संपत्तीवरून वाद होत आहेत. अशा अनेक घटना पाहायला मिळाल्या. आपल्या कुटुंबात असे काही घडू नये यासाठी तातडीने मृत्युपत्र करून घेतले.
- केशव पाटील
मुलींचा वाटा सुरक्षित केला
बरेचदा मुलींना संपत्तीमध्ये वाटा नाकारला जातो. त्यानंतर कुटुंबात भांडणे होतात. न्यायालयात तक्रारी दाखल केल्या जातात. त्यावरून प्रत्येकाला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेता मृत्युपत्र करून दोन मुलींचा वाटा सुरक्षित केला.
- कविता सातपुते़
मृत्यूच्या भीतीमुळे लवकर निर्णय
मला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. तसेच, सध्या कोरोनामुळे सर्वत्र मृत्यूची दहशत परसरली आहे. करिता, मृत्युपत्र करण्याचा लवकर निर्णय घेतला. आपल्या पश्चात वारसांमध्ये संपत्तीवरून वाद व्हायला नको. संपत्ती वाटपात सर्वांना समाधानी करण्याचा प्रयत्न केला आहे.
- राजकुमार वानखेडे.
काय म्हणतात वकील?
मृत्युपत्राची गरज वाटत आहे
मृत्युपत्राविषयी समाजामध्ये फारशी जागृती नाही. अनेक जण आयुष्याच्या अंतिम टप्प्यात मृत्युपत्र करण्यासाठी येतात. तसेच, बहुसंख्य व्यक्ती मृत्युपत्रच करीत नाहीत; परंतु सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता नागरिकांना मृत्युपत्राची गरज वाटायला लागली आहे. मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
- अॅड. रणजित सारडे, अध्यक्ष, महाराष्ट्र नोटरी असोसिएशन.
-------------------
कोरोनाच्या भीतीने जागे केले
नागरिकांना कोरोनाच्या भीतीने जागे केले आहे. सध्या जीवनाचा भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे मृत्युपत्र नोंदवून घेणाऱ्यांची संख्या काही महिन्यांपासून वाढली आहे. सामान्यत: उतरत्या वयात मृत्युपत्र केले जाते. परंतु, सध्या तरुण वयातील व्यक्तीही मृत्युपत्र करीत आहेत.
- अॅड. चंद्रशेखर राऊत, नोटरी
--------------
महिन्याला हजारावर मृत्युपत्रांची नोंदणी
वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनापूर्वी नागपूरमध्ये महिन्याला ४०० ते ५०० मृत्युपत्रांची नोंदणी होत होती. परंतु, गेल्या काही महिन्यापासून ही संख्या वाढली आहे. सध्या महिन्याला १,००० ते १,२०० मृत्युपत्रांची नोंदणी होत आहे.