लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढत्या कोरोनाचा फटका आता विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. मेडिकल व डेंटलचे मिळून १५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने सोमवारी खळबळ उडाली. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांचे वसतिगृहच हॉटस्पॉट ठरू पाहत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. तूर्तास सर्व विद्यार्थ्यांना मेडिकलच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये भरती केले असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मागील दोन आठवड्यापासून नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या क्षेत्रातील नऊ वसाहती कोरोनाच्या हॉटस्पॉट झाल्याची कबुली स्वत: मनपा आयुक्तांनी दिली. याच धर्तीवर आता मेडिकल व डेंटलचे वसतिगृहही हॉटस्पॉट ठरू पाहत तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. मागील दोन वर्षांपासून मेडिकलच्या ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमासाठी २५० तर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील (डेंटल) ‘बीडीएस’ अभ्यासक्रमाला ५३ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. दोन्ही महाविद्यालयाचा ऑल इंडियाचा म्हणजे बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांचा १५ टक्के कोटा असतो. यावर्षी कोविडच्या प्रादुर्भावामुळे दोन्ही महाविद्यालयातील प्रवेशप्रक्रिया उशिरा झाली. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांना आरटीपीसीआर चाचणी करूनच वसतिगृहात प्रवेश देण्यात आला. परंतु बाहेरील राज्यातील काही विद्यार्थी ये-जा करीत असल्याने किंवा त्यांच्या भेटीला कुणी येत असल्याने धोका वाढला आहे. यातच २ फेब्रुवारीपासून दोन्ही महाविद्यालयाचे वर्ग सुरू झाले. यामुळे संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संशय व्यक्त केला जात असतानाच मागील आठवड्यापासून सर्दी, खोकला व ताप असलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी केली जात होती. शनिवारी तपासणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमधून मेडिकलच्या एमबीबीएसचे १०, एका निवासी डॉक्टरसह ११ तर बीडीएसचे ४ असे एकूण १५ विद्यार्थ्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना लागण वसतिगृहातून झाली, वर्गातून झाली की कुणा बाहेरील व्यक्तीकडून, याचा शोध घेतला जात आहे. परंतु पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याने दोन्ही महाविद्यालयांनी खबरदारी घेणे सुरू केले आहे.
एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील नऊ विद्यार्थी
एमबीबीएसला प्रवेश घेऊन वर्ग सुरू होत नाही तोच प्रथम वर्षातील नऊ, द्वितीय वर्षातील एक विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आली. शिवाय, बीडीएसच्या द्वितीय वर्षातील चार विद्यार्थिनी तर, बधिरीकरणात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेला एक विद्यार्थ्याचा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे.
संपर्कात आलेले विद्यार्थी, शिक्षक क्वारंटाईन
या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले विद्यार्थी, शिक्षकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सात दिवसामध्ये त्यांच्यात लक्षणे आढळून आल्यास त्यांची तपासणी केली जाईल. यात पॉझिटिव्ह आढळल्यास रुग्णालयात भरती केले जाणार आहे.
सर्वांची प्रकृती स्थिर
मेडिकल व डेंटलचे मिळून १२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. यांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे. लागण कुठून झाली याचाही शोध घेतला जाईल.
- डॉ. अविनाश गावंडे
वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल