नागपूर : हैदराबाद येथील नेहरू प्राणिशास्त्र उद्यानात आठ आशियाई सिंहांमध्ये कोरोना संसर्गाचे निदान झाल्याने आता महाराष्ट्र वन्यजीव प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली आहे. सीएसआयआर-सेंटर फॉर सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र (सीसीएमबी) यांच्यामार्फत सिंहांच्या लाळ नमुन्यांची तपासणी केल्यावर त्यांच्यातील कोरोना संसर्ग उघडकीस आला.
या संदर्भात ‘लोकमत’ शी बोलताना महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे प्रभारी संजय माळी म्हणाले, नेहरू प्राणिशास्त्र उद्यानात आठ आशियाई सिंहांमध्ये कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे तपासणीत आढळले. राज्यात दहा प्राणिसंग्रहालये, चार बचाव केंद्रे आणि एमझेडए अंतर्गत संक्रमण उपचार केंद्र आहेत. या केंद्रांमध्ये वन्यप्राण्यांच्या विविध प्रजाती आहेत. या परिस्थितीवर बारीक लक्ष असून लवकरच आवश्यक आदेश जारी केले जातील, असे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणूंचा संसर्ग सुरू झाल्यानंतर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) गेल्या वर्षी दोन सल्लागार नियुक्त केले होते, हे उल्लेखनीय !
केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या मते, संसर्ग झाल्याचे लक्षात आल्यावर या आठही सिहांना विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. आता त्या सर्वांची प्रकृती चांगली असून चिंता करण्यासारखी स्थिती नाही. माणसांकडून प्राण्यांमध्ये संक्रमण आल्याच्या म्हणण्याला सध्यातरी पुरावे नाहीत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहांच्या विष्ठेच्या नमुन्यांची चाचणी घेण्यासाठी एक पद्धत विकसित केली जात आहे. प्रत्येक वेळी वन्यप्राण्यांच्या लाळेचे नमुने गोळा करणे शक्य नसल्याने ही पद्धत भविष्यात उपयुक्त ठरेल. नेहरू प्राणिउद्यानातील सिंहांमध्ये असलेल्या विषाणूचा नवीन प्रकार नाही. सिंहांना सौम्य लक्षणे असून त्यांचा आहारही चांगला आहे. सिहांमध्ये तापाची लक्षणे दिसून आल्यावर हे नमुने गोळा करून परीक्षणासाठी आण्विक जीवशास्त्र विभागाकडे पाठविले. अलीकडेच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, बार्सिलोना (स्पेन) आणि अमेरिकेत ब्रॉन्क्समधील प्राणिसंग्रहालयात असलेले वाघ आणि सिंहांचे नमुने कारोना पॉझिटिव्ह आले होते.
...
देशभरातील प्राणिसंग्रहालये बंद
देशात कोरोना विषाणूंचा झपाट्याने प्रसार होत असल्याने वन आणि पर्यावरण मंत्रालयाने सर्व वन उद्याने, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व वन्यजीव अभयारण्य अभ्यागतांसाठी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, राज्यातील बहुतेक उद्याने आणि प्राणिसंग्रहालये १५ मे पर्यंत बंद आहेत.