लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन हा सर्वांसाठीच सारखा नसतो. गरिबांचे मोठे हाल होतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपुरातील प्रशासनाने कडक निर्बंध उठवले. परिणामी सर्व व्यवहार सुरळीत झाला. परंतु कोरोनाचा धोका टळला असे समजू नका. कारण सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने कोरोनाचा खरा धोका आता वाढलेला आहे. तेव्हा यापुढे नागरिकांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. आपली व आपल्या जवळच्यांची काळजी घ्या.
शहरातील सर्व व्यवहार सुुरळीत असल्याने बाजारात गर्दी वाढलेली आहे. कडक निर्बंध नसल्याने लोकसुद्धा बिनधास्त झाले आहेत. गुरुवारी याचा प्रत्यय दिसून आला. लोक बिनधास्तपणे बाजारात वावरत होते. मास्क नावालाच होता. अनेकांनी तर मास्क लावलेलेच नव्हते. सुरक्षित अंतराची तर कुणाला काळजीच नव्हती. एकूणच कोरोना जणू नागपुरात नाहीच असे लोक वागताना दिसून आले. परंतु हा बिनधास्तपणा व निष्काळजीपणा आपल्याला मोठ्या संकटात टाकेल, हे विसरू नका. कारण कोरोना संक्रमणाचा धोका अजूनही गंभीर आहे. त्यामुळे हे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने आता संपूर्ण जबाबदारी नागरिकांवर सोडली आहे. तेव्हा नागरिकांनी स्वत:च खबरदारी घ्यावी. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी कोविड नियमावली वेळोवेळी जारी करण्यात आलेली आहे. यात सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कशिवाय घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे शक्यतोवर टाळावे, वारंवार हात धुवावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा या आहेत. या गोष्टी आता नागरिकांनी अधिक गंभीरतेने कराव्या लागणार आहेत.
लग्न समारंभ व इतर घरगुती कार्यक्रमामध्ये काळजी घ्या
प्रशासनाने लग्न समारंभात ५० जण व अंत्यसंस्काराला २० जणांची मर्यादा आखून दिली आहे. कडक निर्बंध नाहीत म्हणून काही लोक याचा गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाले तर आपण प्रशासनाची नव्हे तर स्वत:चीच फसवणूक करून घेऊ. आपण आपले व आपल्या नातेवाईकांचेच आरोग्य धोक्यात घालू. त्यामुळे कमीत कमी लोकांमध्ये कार्यक्रम घ्या. आपली व आपल्या नातेवाइकांची काळजी घ्या.
बाजारातील गर्दी टाळा
बाजार आता दिवसभर सुरू राहणार असल्याने बाजारातील अनावश्यक गर्दी टाळा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, बाहेर जातानाही मास्कशिवाय जाऊ नका. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा, इतरांनाही त्यासाठी प्रेरित करा.