सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या तीन महिन्यापासून नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. यात पावसाळ्याच्या तोंडावर रुग्णसंख्येचा उच्चांक दिसून येऊ लागला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ९००च्या घरात गेली आहे. पावसाळ्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, ही भीती कितपत खरी ठरू शकते? या विषयी स्थानिक तज्ज्ञांना बोलते केले असता, त्यांनी विविध कारणे देत जुलै महिन्यात रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. याला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे कठोरतेने पालन करणे आवश्यक असल्याचा सल्लाही दिला आहे.जुलैमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची शक्यता : डॉ. देशमुखप्रसिद्ध फिजिशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, पावसाळ्यातील जे आजार आहेत उदा. कावीळ, गॅस्ट्रो, व्हायरल, मलेरिया, डेंग्यूमध्ये शरीराची रोग प्रतिकार शक्ती कमी होते, परिणामी कोरोनाचा धोका वाढू शकतो. यामुळे मागील तीन महिन्यात भीतीपोटी म्हणा की, जागरूकतेपोटी ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या त्यांचे काटेकोरपणे पालन पुढील दोन महिने करणे आवश्यक आहे. अन्यथा जुलैमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येतील. पावसात भिजू नका, उकळून थंड केलेले पाणीच पिण्यासाठी वापरा, उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा, आजारी व्यक्तीपासून दूर राहा, लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या, घराबाहेर पडताना फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर करा. मला आजार होणारच नाही, या भ्रामक कल्पनेत राहू नका, असेही डॉ. देशमुख म्हणाले.धोका वाढण्याची भीती- : डॉ. अरबटप्रसिद्ध श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले, कोरोनाला घेऊन आजही पाश्चिमात्य देशांशी आपण आपली तुलना करीत आहोत. त्यांच्याकडील पायाभूत सोयी, लोकसंख्या आणि वैद्यकीय सोयी आपल्यापेक्षा फार वेगळ्या आहेत. यामुळे आपण या रोगात तूर्तास तरी अडकलो आहोत. पावसाळ्यात लवकर इन्फेक्शन पसरण्याची भीती असते. परिणामी, कोरोनाचा आजार दुपटीने पसरण्याची शक्यता आहे. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग, चांगल्या मास्कचा योग्य पद्धतीने वापर आणि वारंवार हाताची स्वच्छता याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. सोबतच या रोगाचे हायरिस्क असलेले वृद्ध, लहान मुले व गर्भवतींची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या कोरोनाचा आजार प्रत्येकाच्या दाराजवळ पोहचला आहे. तो आत येऊ द्यायचा की नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.पावसाळ्यात विषाणू पसरण्यास पूरक वातावरण : डॉ. दंदेप्रसिद्ध फिजिशियन डॉ. पिनाक दंदे म्हणाले, पावसाळा आणि कोरोना विषाणू यांचा थेट संबंध नाही. मात्र, पावसाळ्यात हवेतली आर्द्रता वाढते. त्यामुळे विषाणू पसरण्यासाठी पूरक वातावरण मिळते. सध्या लॉकडाऊन शिथिल झाल्याने लोक एकमेकांच्या संपर्कात येऊ लागले आहेत. शिवाय, पावसाळ्यातील सर्दी, पडसे, व्हायरलमुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. अशावेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास धोका वाढू शकतो. यामुळे प्रत्येकाला काळजी घ्यावीच लागणार आहे.पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढणार: डॉ. खळतकरप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर म्हणाले, लॉकडाऊन शिथिल केल्याने रस्त्यांवर, दुकानांमध्ये, कार्यालयांत गर्दी वाढली आहे. या दिवसांमध्ये मलेरिया, डेंग्यू व्हायरलचे सर्वाधिक रुग्ण आढळून येतात. यांची लक्षणे आणि कोरोनाची लक्षणे ओळखण्यास गल्लत होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी, जुलैच्या १५ तारखेनंतर कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे प्रत्येकाने कोणत्याही आजारापासून स्वत:ला वाचविणे हाच यावर उपाय आहे. विशेषत: लहान मुलांची काळजी घ्यायला हवी. १५ आॅगस्टनंतर शाळांना सुुरुवात करायला हवी. मुलांच्या आहारातून त्यांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढेल, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे.पावसाळ्यात विषाणू कमी होईल, याचे पुरावे नाहीत : डॉ. मिश्राएम्सच्या मायक्रोबायोलॉजिस्ट विभागाच्या प्रमुख डॉ. मीना मिश्रा म्हणाल्या, उन्हाळ्यात उष्ण हवामानात हा विषाणू नष्ट झाला नाही तर पावसाळ्यातील थंड वातावरण आणि आर्द्रतेमुळे विषाणू मोठ्या प्रमाणावर पसरेल असेही नाही. मात्र, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, असे काही पुरावे नसले तरी तो पावसाळ्यात कमी होईल, याचेही पुरावे नाहीत. आपल्याकडे ज्या पद्धतीने गर्दी वाढत आहे ती जुलै महिन्यात धोकादायक ठरू शकते. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे.
Coronavirus in Nagpur; पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:15 AM
पावसाळ्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, ही भीती कितपत खरी ठरू शकते? या विषयी स्थानिक तज्ज्ञांना बोलते केले असता, त्यांनी विविध कारणे देत जुलै महिन्यात रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
ठळक मुद्देजुलै महिन्यात रुग्ण वाढण्याची शक्यताफिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर आवश्यक