नागपूर : कोरोनाचा पहिल्या व दुसऱ्या लाटेतील १७ महिन्यांच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यातील कोरोनाचा संक्रमणाचा दर सर्वांत कमी होता. या महिन्यात १,४०,६५८ नमुने तपासले असता, यातून १४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. संक्रमणाचा दर केवळ ०.१० टक्के होता. ३ रुग्णांचा बळी गेला आहे.
कोरोनाची पहिली लाट सप्टेंबर २०२० मध्ये तीव्र झाली. या महिन्यात ४८,४५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर १४,०६ मृत्यू झाले. संक्रमणाचा दर २४.६३ टक्के होता. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक भयावह ठरली. एप्रिल २०२१ मध्ये १,८१,७४९ रुग्णांची नोंद, तर २,२९० रुग्णांचे बळी गेले. या महिन्यात संक्रमणाचा दर २७.८९ टक्के होता. सध्याच्या स्थितीतील कोरोना संसर्ग हा सुरुवातीच्या पहिल्या दोन महिन्यांसारखा दिसून येत आहे. मार्च २०२० मध्ये ६६६ नमुन्यांमधून १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. संक्रमणाचा दर २.४० टक्के होता, मृत्यूची नोंद नव्हती. एप्रिल २०२० मध्ये २२७२ नमुन्यांमधून १२३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आणि २ मृत्यू होते. मे २०२० मध्ये संसर्ग वाढला. या महिन्यात ९१७१ नमुन्यांमधून ३९२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. संक्रमणाचा दर ४.२७ टक्के होता, तर मृत्यूची संख्या ११ वर गेली होती. यावरून या वर्षात ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे.
-१८ दिवसांनंतर जिल्ह्याबाहेरील रुग्णाचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यात १८ दिवसांनंतर मंगळवारी कोरोनामुळे जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली. शिवाय, शहरात ५, तर ग्रामीण भागात, २ असे एकूण ७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,९३,०३० तर मृतांची संख्या १०,११९ वर पोहोचली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत आज केवळ २ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ४,८२,८४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ६६ असून, यात शहरात ६३, तर ग्रामीण भागात ३ रुग्ण आहेत.
-सर्वांत कमी संक्रमण असलेले महिने
महिना : चाचण्या : रुग्ण : संक्रमणाचा दर : मृत्यू
ऑगस्ट २१ : १४०६५८ : १४५ : ०.१० टक्के : ०३
जून २१ : २६६८६१ : २४४७ : ०.९१ टक्के : १२३
मार्च २० : ६६६ : १६ : २.४० टक्के :००
एप्रिल २० : २२७१ : १२३ : ५.४१ टक्के : ०२
नोव्हेंबर २० : १५१२३३ : ८९७९ : ५.९३ टक्के : २६९