नरखेड/कळमेश्वर/कामठी/काटोल : नागपूर जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाबाधितांची संख्या ३,०२,४८० वर पोहोचली. नागपूर शहरात ३,८१३ तर नागपूर ग्रामीणमध्ये २,३७५ रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा वेग अधिक आहे. पहिल्या लाटेत कोरोनाला वेशीवर रोखणाऱ्या जिल्ह्यातील १६७२ गावांतही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
सध्या जिल्ह्यातील १,९०४ गावांपैकी ८६९ गावेच कोरोनामुक्त आहेत. यात कमी लोकसंख्या आणि विरळ वस्ती असलेल्या गावांची संख्या अधिक आहे. गाव कोरोनामुक्त ठेवण्यात येथील ग्रामपंचायतींनी आखलेल्या उपाययोजना व त्यास गावकऱ्यांनी केलेले सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. नागपूर जिल्ह्यात (ग्रामीण) ७६८ ग्रामपंचायती आहेत. याअंतर्गत १,९०४ गावांचा कारभार चालतो. गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतरच उपराजधानीत कोरोनाने शिरकाव केला. याच काळात गावाच्या वेशी सील करण्यात आल्या. गावाच्या वेशीवर बाहेरगावावरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोखण्यात आले. प्रसंगी वादही झाले. गावकरी आणि सरपंच त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्याने त्यावेळी जिल्ह्यातील अनेक गावांत कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. मात्र, डिसेंबरनंतर अनलॉकच्या प्रक्रियेनंतर संक्रमण वाढीला वेग आला. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यात १,०३,६८९ रुग्णांची नोंद झाली आहे, तर १७४३ जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत ७१,८७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ग्रामीण भागात ३०,५४९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रात कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक आहे. यात सावनेर, उमरेड, कामठी, कन्हान, कळमेश्वर, वानाडोंगरी, हिंगणा, काटोल नगर परिषद क्षेत्रात स्थिती निश्चितच चिंताजनक आहे. गतवर्षी गावातील व्यक्ती गावात आणि बाहेरील व्यक्ती बाहेरच हा मंत्र ग्रामपंचायतींनी अवलंबल्याने एप्रिल आणि मे महिनाअखेर जिल्ह्यातील बहुतांश तालुके कोरोनामुक्त राहिले. मेनंतर ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर अखेर ही परिस्थिती आटोक्यात येत असतानाच अनलॉकनंतर गावातील कामगार, मजूर, नोकरदार रोजगारासाठी बाहेर पडल्यानंतर गावात कोरोनाचा शिरकाव होऊ लागला.
जिल्ह्यात एकूण गावे : १,९०४
सध्या कोरोना रुग्ण असलेले गाव : १०३५
कोरोनामुक्त गाव : ८६९
आमचे काय चुकले?
कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाहेरच्यांना गावबंदी होती. मात्र, अॅनलॉकनंतर गावातील कामगार व मजूरवर्ग बाहेर पडला. अशात या परिसरात कंपन्यांचे प्रमाण जास्त आहे. परत गेलेला कामगार पुन्हा परतला. मात्र, यातील काहींनी बाधित असतानाही प्रशासनाकडून माहिती लपविली. त्यामुळे गावात कोरोनाचे संक्रमण वाढले.
- प्रांजल वाघ, सरपंच, कढोली, ता. कामठी
----
पहिल्या लॉकडाऊननंतर गावात बाधितांची संख्या नव्हती. ग्रामपंचायतीने बाहेरच्यांना प्रवेश देताना कडक निर्बंध लावले होते. अॅनलॉकनंतर वर्दळ वाढली. लग्नसमारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे रुग्ण वाढले. गावात आजही कडक निर्बंध असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आहे.
- उषा मनीष फुके, सरपंच, येनीकोनी, ता. नरखेड
---
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर लगेच बाहेरच्यांना गावबंदी करण्यात आली. गावातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात आली. घरोघरी जनजागृती करण्यात आली. आजही हे कार्य सुरू आहे. मात्र, अनलॉकनंतर गावातील कामगार आणि नोकरदार रोजगारासाठी बाहेर पडले. यासोबतच सार्वजनिक समारंभही वाढले. त्यामुळे गावात संक्रमण झाले.
- दिलीप डाखोळे, सरपंच, वरोडा. ता. कळमेश्वर
या गावांत संक्रमण अधिक
पहिल्या लाटेनंतर कोरोनामुक्त असलेल्या अनेक गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. यात तालुकानिहाय संक्रमण झालेल्या काही प्रमुख गावांची नावे - भिवापूर : नांद, सेलोटी, भिवापूर, जवळी, कारगाव, सोमनाळा, शिवापूर, बोर्डकला, बेसूर. कामठी : येरखेडा, रनाळा, कोराडी, महादुला, वडोदा, आजनी. पारशिवणी : पारशिवणी, कन्हान, कांद्री, नयाकुंड, तामसवाडी, पारडी. हिंगणा : निलडोह, डिगहोह देवी, हिंगणा, रायपूर, कान्होलीबारा, गुमगाव, टाकळघाट. सावनेर : सावनेर, चिचोली, खापा, पाटणसावंगी, केळवद, बडेगाव, वाघोडी, वाकोडी. नरखेड : मन्नाथखेडी, सिंदी (उमरी), अंबाडे (दे), खंडाळा, सारडी, पिठोरी, सिंगारखेडा, सिंजर, मायवाडी, पिपळा केवळराम. उमरेड : वायगाव घोटुर्ली, भिवगड, बेला, पाचगाव, सिर्सी, चनोडा. कळमेश्वर : मोहपा, धापेवाडा, तिष्ठी, कोहळी, तेलगाव, गौंडखेरी. काटोल : कोंढाळी, रिधोरा, सोनखांब, पारडसिंगा, मेंढेपठार. मौदा : कोदामेंढी, भांडेवाडी, बोरगाव, मारोडी, कोटगाव. कुही : मांढळ, वेलतूर, गोन्हा, कुचाडी, आंभोरा, हरदोली राजा, सोनपुरी. रामटेक : मनसर, देवलापार, शीतलवाडी, क्रांदी माईन्स. नागपूर ग्रामीण : दवलामेटी, लाव्हा, खापरी, डिफेन्स.