नागपूर : मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने दोन हजारांच्या वर असताना गुरुवारी यात आणखी मोठी भर पडली. २४ तासांतच जिल्ह्यात साडेचार हजारांच्या जवळपास रुग्ण आढळले. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्ण व मृत्यूसंख्या वाढल्याने कोरोनाची दाहकता हळूहळू जाणवायला लागली आहे. पॉझिटिव्हीटीची टक्केवारी ३१.९८ टक्क्यांवर पोहोचली आहे.
गुरुवारच्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात ४ हजार ४२८ रुग्ण आढळले. यातील ३ हजार १८६ रुग्ण तर शहरातीलच होते. ग्रामीणमध्ये १ हजार १५३, तर जिल्ह्याबाहेरील ८९ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात झालेल्या सहा मृत्यूंपैकी तीन शहरांत तर दोन ग्रामीण भागात झाला. एक मृत्यू जिल्ह्याबाहेरील रुग्णाचा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५ लाख २१ हजार ६५४ वर पोहोचला असून, मृत्यूसंख्या १० हजार १४७ झाली आहे.
दुसरीकडे सक्रिय रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे. सध्यस्थितीत नागपूर जिल्ह्यात १८ हजार ६७९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील १४ हजार ८१९ रुग्ण शहरात, तर ३ हजार ६५६ ग्रामीण भागात आहेत. इस्पितळ व संस्थात्मक विलगीकरणात दाखल होणाऱ्यांची संख्यादेखील वाढीस लागली आहे. ७० टक्के (१३ हजार २५०) रुग्ण गृह विलगीकरणात असून ५ हजार ४२९ रुग्ण विविध सरकारी, खासगी इस्पितळे तसेच संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
चाचण्या व बरे होणारेदेखील वाढले
नवीन बाधित वाढत असताना बरे होणारे रुग्ण व चाचण्यादेखील वाढल्या आहेत. २४ तासांत जिल्ह्यात १ हजार ९८५ रुग्ण बरे झाले. यात शहरातील १ हजार ४९७ रुग्णांचा समावेश होता. गुरुवारी एकूण १३ हजार ८४८ चाचण्या झाल्या. शहरात १० हजार १७ तर ग्रामीणमध्ये ३ हजार ८३१ चाचण्या झाल्या.