लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेयोतील यंत्र बंद पडताच कोरोना तपासणीची जबाबदारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) आपल्याकडे घेतली. परंतु राज्य सरकारने ‘टेस्टिंग किट’ उपलब्धच करून दिले नाही. सुत्रानूसार, ‘एम्स’कडे सध्या ६०वर नमुने तपासणीपुरतेच किट उपलब्ध आहेत. यामुळे छत्तीसगड सरकारकडून त्यांनी किटची मागणी केली. किटचा तुटवडा असाच राहिल्यास तपासणी बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, दिल्ली व मरकजहून आलेल्यांसह इतरही संशयितांचे ५००वर नमुने मेयोमध्ये प्रलंबित पडले आहेत. कोरोना विषाणूची लागण झालेले किंवा संशयितांच्या घशातील द्रव पदार्थाच्या नमुन्याची तपासणी ‘टेस्टिंग किट’च्या मदतीन केली जाते. ही किट ‘पॉलिमरेज चेन रिअॅक्शन’ (पीसीआर) पद्धतीची असते. नागपुरात ही तपसणी मेयोच्या प्रयोगशाळेत सुरू आहे. वाढते नमुने लक्षात घेऊन नुकतेच मेयो प्रशासनाने शासनाकडून ६००वर किट मागवून घेतल्या. परंतु दोन दिवसांपूर्वी प्रयोगशाळेतील एक यंत्र बंद पडले. दुसºया यंत्रावर २०वर नमुने तपासता येत नाही. यातच मागितलेल्या या किट नव्या यंत्रासाठी असल्याने ही प्रयोगशाळाही अडचणीत आली आहे. रविवारी मेयोतील बंद यंत्राची चाचणी घेणे सुरू झाले असलेतरी यंत्र कधी सुरू होईल, याचेही उत्तर कुणाकडेच नाही. सध्या ‘एम्स’मध्ये कोरोना तपासणी सुरू झाली आहे. एका टप्प्यात ९०वर नमुने तपासण्याची यंत्राची क्षमता आहे. परंतु ‘किट’चा तुटवडा असल्याने तेही अडचणी आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘एम्स’ने राज्य शासनाकडे ‘किट’ची मागणी केली. परंतु त्यांना तुर्तास मिळाल्या नाहीत. त्यांनी छत्तीसगड शासनाकडे किटची मागणी केली असता त्यांनी दोन बॉक्स देण्यास परवानगी दिली. एका बॉक्समधून जास्तीत जास्त ३३ वर तपासण्या होतात. यामुळे ‘एम्स’ने तातडीने रविवारी छत्तीसगडसाठी एक वाहन रवाना केल्याची माहिती आहे. ‘एम्स’च्या संचालक डॉ. विभा दत्ता यांना याबाबत विचारले असता त्यांनी याला दुजोरा दिला.-प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढलीदिल्ली व मरकजहून आलेल्या व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे मोठ्या संख्येत नमुने मेयोत आले आहेत. एकट्या गोंदिया जिल्ह्यातून ७५ वर नमुने आले आहेत. सध्याच्या स्थितीत ५००वर नमुने प्रलंबित असल्यचे स्वत: मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी सांगितले.
-टेस्टिंग किटची समस्या राहणार नाहीपूर्वी मागणीनुसार टेस्टिंग किट मागविल्या जायच्या. परंतु आता मेयो सोबतच ‘एम्स’मध्येही नमुन्यांची तपासणी होऊ लागली आहे. यामुळे पुरेशा प्रमाणात किट मागितल्या आहेत. लवकरच त्या प्रयोगशाळांना उपलब्ध करून दिल्या जातील.
-डॉ. संजीव कुमार विभागीय आयुक्त