नागपूर : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. गुरुवारी ८ नव्या रुग्णांची भर पडली. या महिन्यातील कोरोनाचा रुग्णांची संख्या २०वर पोहचली आहे. सध्या ११ रुग्ण अॅक्टीव्ह असून ५ रुग्ण विविध खासगी रुग्णालयात उपचाराखाली आहेत.
कोरोनाच्या ‘जेएन.१’ या नव्या व्हेरियंटला घेवून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महानगरपालिकेने ‘जीनोम सिक्वेन्सिंग’साठी आतापर्यंत १० नमुने पाठविण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. यामुळे तुर्तास नागपुरात नव्या व्हेरिएंटचा रुग्ण नाही. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. गुरुवारी आढळून आलेल्या ८ रुग्णांमध्ये ७८, ५३, ५१ व ४० वर्षीय पुरुष असून ६६, ४५, ३०व २० वर्षीय महिलेचा समावेश आहे. सध्या लक्ष्मीनगर, धरमपेठ व हनुमाननगर झोनमध्ये प्रत्येकी ३ तर नेहरूनगर व धंतोली झोनमधील प्रत्येकी १ असे एकूण ११ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. यातील ५ रुग्ण खासगी रुग्णालयात भरती आहेत.