नागपूर : फेब्रुवारी महिन्यापासून सुरू असलेला कोरोनाचा कहर आता शहर आणि ग्रामीणमध्येही उतरणीला लागला आहे. शुक्रवारी ३६५ रुग्ण व ११ मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, आज आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. नागपूर जिल्ह्यात १६,१५१ चाचण्या झाल्या असताना, त्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर केवळ २.२५ टक्के होता. शहरात २१६ रुग्ण व ६ मृत्यू तर ग्रामीणमध्ये १४६ रुग्ण व २ मृत्यूची नोंद झाली.
कोरोना नियंत्रणात येत असल्याचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. या आठवड्यात चार दिवस दैनंदिन रुग्णसंख्या ५००च्या आत होती, तर मृत्यूची संख्या सहा दिवस २५च्या खाली आली. शहरात आज ११,६२९ चाचण्या झाल्याने पॉझिटिव्हिटीचा दर १.८५ टक्के, तर ग्रामीणमध्ये ४,५२२ चाचण्या होऊन पॉझिटिव्हिटीचा दर ३.२२ टक्के होता. नागपूर जिल्हात रुग्णांची एकूण संख्या ४,७३,५३७ झाली असून, मृतांची संख्या ८,८६५ वर पोहोचली आहे. आज १,३३३ रुग्ण बरे झाले. रिकव्हरी रेट म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४२ टक्के झाले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे ८,०९३ सक्रिय रुग्ण असून, यातील ५,५२० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे.
-६७ रुग्णालयात कोरोनाचे शून्य रुग्ण
एप्रिल महिन्यात कोरोनाचा रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले असताना, शुक्रवारी ३११ कोविड रुग्णालय, कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटर मिळून ६७ रुग्णालयांत कोरोनाचे शून्य रुग्ण होते. शासकीयसह मोठ्या खासगी इस्पितळात ६० ते ८० टक्क्यांहून जास्त कोरोनाचे बेड रिकामे आहेत. सध्या कोरोनाचे २,५७३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
:: कोरोनाची शुक्रवारची स्थिती
दैनिक चाचण्या: १६,१५१
शहर : २१६ रुग्ण व ६ मृत्यू
ग्रामीण : १४६ रुग्ण व २
ए. बाधित रुग्ण : ४,७३,५३७
ए. सक्रिय रुग्ण : ८,०९३
ए. बरे झालेले रुग्ण : ४,५६,५७९
ए. मृत्यू : ८,८६५