लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे फुलांसह सर्वच मार्केट बंद असल्यामुळे आणि मागणीच नसल्याने नागपूर जिल्ह्यात फुलशेतीला कोट्यवधींचा फटका बसला आहे. फुलांची विक्री होत नसल्याने तोडणीला आलेली फुले शेताबाहेर फेकावी लागत आहेत. या आपत्तीने फूल उत्पादक खचले असून बँकेच्या कर्जाची चिंता सतावत आहे. शासनाने आर्थिक मदत करावी, अशी पुष्प उत्पादक संघाची मागणी आहे.महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, नागपूर जिल्ह्यात ४५ पेक्षा जास्त पॉलिहाऊस आणि ६०० ते ७०० फूल उत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्याकडून सीताबर्डी, नेताजी मार्केटमधील महात्मा फुले पुष्प उत्पादक बाजारात फुलांची विक्री करण्यात येते. दररोज १५ ते २० लाख रुपयांचा व्यवसाय होतो. पण कोरोनामुळे २० मार्चपासून मार्केट बंद आहे. त्यामुळे उत्पादकांकडून आवकच बंद झाली आहे. सजावटीची फुले पॉलीहाऊस आणि पूजेची फुले शेतातच आहेत. झाडे खराब होऊ नये म्हणून दररोज फुले तोडून फेकून द्यावी लागत आहेत. मार्च ते मे या तीन महिन्यात लग्नसमारंभ आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. फुलांची सर्वाधिक विक्री याच महिन्यात होते. पण विक्रीच बंद असल्याने दररोज झाडांना येणाऱ्या फु लांचे काय करायचे, असा प्रश्न उत्पादकांसमोर उभा राहिला आहे. तीन महिने बँकांचे कर्जाचे हप्ते भरायचे नाहीत. पण त्यानंतर बँकेचे कर्मचारी वसुलीसाठी घरी येतील, नोटिशी देतील. सततच्या तोट्यामुळे त्यांच्यासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.काटोल येथील पुष्प उत्पादक अंकित लांडे म्हणाले, पॉलीहाऊसमधून जरबेरा सजावटीच्या फु लांचे उत्पादन घेण्यात येते. सध्या सीझन आहे. पण कोरोनामुळे २० मार्चपासून फुलबाजार बंद असल्याने विक्री ठप्प झाली आहे. पॉलीहाऊसमध्ये फुलांचे दररोज उत्पादन येते. पण विक्री बंद असल्याने तोडून फेकून द्यावी लागतात. दररोज ३ ते ४ हजारांची फुले फेकावी लागतात. फु ले न तोडल्यास झाडे खराब होण्याची भीती असते. खत आणि मजुरांचा दररोजचा खर्च सुरूच आहे. अर्ध्या एकरातील पॉलीहाऊसमध्ये नोव्हेंबर २०१८ मध्ये प्लॅन्टेशन केले. ३२ लाखांचा प्रकल्प आहे. तीन महिन्यात ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. यावर्षी लग्नसमारंभही नसल्याने ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. बँकांची सबसिडीची रक्कम अजूनही आलेली नाही. यंदा कोरोनामुळे गंभीर संकट आले आहे.ग्लॅडिओ, अस्टर, झेंडू, डीजी फुलांचे नागपूर जिल्ह्यातील (ता. कोंढाळी, मौजा खैरी) उत्पादक विनोद रणनवरे म्हणाले, १२ एकरात फु लांचे उत्पादन १९८९ पासून घेण्यात येत आहे. ३१ वर्षांच्या काळात असे गंभीर संकट पहिल्यांदाच पाहत आहे. २० मार्चपासून महात्मा फुले पुष्प उत्पादक बाजार बंद आहे. बाजाराबाहेर फु लांना कुणीही खरेदीदार नाही. फुले जास्त दिवस टिकत नाहीत. दररोज फु लांची तोडणी करावी लागते. फुलांची विक्रीच होत नसल्याने दररोज फेकून द्यावी लागत आहेत. दहा दिवसात दीड लाखाचा तोटा झाला आहे. पुढे स्थिती अशीच राहिल्यास दररोज तोटा वाढणार आहे. झाडांची जोपासना करण्यासाठी फुलांना फेकावे लागत आहे. अर्थात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कोरोनाचा नायनाट होऊन व्यवसाय सुरळीत व्हावेत, अशी अपेक्षा आहे.बाजारातील कर्मचाऱ्यांची उपासमारनेताजी मार्केटमधून मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात फुलांची विक्री होते. बाजारात ६० व्यापारी असून प्रत्येकाकडे तीन ते चार कर्मचारी काम करतात. हे कर्मचारी नोंदणीकृत नाहीत. त्यांच्याकडे काम नाही. त्यांची आवक बंद झाली असून त्यांची उपासमार होत आहे. प्रारंभी व्यापाऱ्यांनी त्यांना आर्थिक मदत केली. पण व्यवसाय बंद असल्याने वारंवार मदत करणे शक्य नाही. कर्मचाऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी रणनवरे यांनी केली.
कोरोनामुळे फुलांचा सुगंध हरवला : फूल उत्पादकांना कोट्यवधींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 9:20 PM
कोरोनामुळे फुलांसह सर्वच मार्केट बंद असल्यामुळे आणि मागणीच नसल्याने नागपूर जिल्ह्यात फुलशेतीला कोट्यवधींचा फटका बसला आहे.
ठळक मुद्दे बँकेच्या कर्जाची चिंता, शासनाकडे मदतीची मागणी