नागपूर : रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला यंदा बाजारात दरवर्षीप्रमाणे उत्साह दिसला नाही. केवळ आवश्यक वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांचा भर दिसून येत आहे. रंगपंचमीला लागणाऱ्या वस्तूंची किरकोळ दुकाने सजली आहेत. यंदा रंगांचा उत्साह नसल्याने खरेदीही मंदावली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे होळीचा उत्साह मावळला असून, आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
वस्तूंची कमी दरात विक्री
मालाची विक्री होत नसल्याने तोटा सहन करून व्यापाऱ्यांना रंगपंचमीच्या वस्तूंची विक्री करावी लागत आहे. इतवारी आणि महाल भागात वस्तूंच्या विक्रीची दोन-चार दुकाने दिसून आली. शनिवारी आणि रविवारी बाजारात उत्साह दिसला नाही. खरेदीदार नसल्याने विक्रेत्यांनी लवकरच दुकाने बंद केली. प्रशासनाने सार्वजनिकरीत्या होळी साजरी करण्यावर प्रतिबंध लावल्याने उत्सव चार भिंतीत साजरा होणार आहे. पिचकारी, मुखवटे, रंग, गुलाल आदींच्या दुकानात ग्राहक नाहीत; पण किराणा दुकान, डेअरी, भाजीपाला, हॉटेल्स, मिठाई खरेदीसाठी गर्दी दिसून आली. त्यामुळेच बाहेर होळी खेळण्याऐवजी घरी राहूनच खाण्यापिण्याचा आनंद लुटण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे.
बाजारपेठांमध्ये निरुत्साह
यंदा इतवारी, महाल, सदर, धरमपेठ, देवनगर, गिट्टीखदान, खामला, जरीपटका, इंदोरा आदींसह शहरातील अन्य बाजारात लागणारी अस्थायी दुकाने दिसली नाहीत. मुख्य बाजारातही काहीच दुकाने खुली होती. प्रशासनाच्या गाइडलाइनमुळे लोक होळीच्या वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडत नसल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सार्वजनिकरीत्या होळी साजरी करण्यावर प्रतिबंध असल्याने लोक होळी साजरी कशी करणार, असा व्यापाऱ्यांचा सवाल आहे. याशिवाय मनपाच्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यंदा ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले.
लोकांमध्ये कोरोनाची भीती
शहरात आणि ग्रामीण भागात दरदिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेकांनी गर्दी करण्याऐवजी होळी घरीच साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य चांगले राहिले तर पुढील वर्षी होळी साजरी करू, असे लोकांचे मत आहे.