प्रवीण खापरे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चेहऱ्यावर रंग फासून, भावनांचा गहिवर आतल्या आत कोंबून रसिकांसमोर त्यांना हवे तसे पात्र साकारणारा कलावंत वाटतो तितका सोपा नाही. रंगमंचावर बहुरूपे साकारणारा हा कलावंत जगण्यासाठी करत असलेला संघर्ष क्वचितच कुणाच्या तरी नजरेस पडतो. त्याचे कारण म्हणजे, स्वत:विषयी दयाभाव निर्माण होणे त्याच्यासाठी घातक असते. कलावंताचे अस्तित्त्व त्याच्यातील रसिकांच्या मनात ठाण मांडून असते. दयाभाव आला की मुूल्य नसते आणि तसे झाले की कलावंत मेलेला असतो. कोरोना काळात ही स्थिती प्रकर्षाने जाणवते आहे. गेले साडेसात महिने रंगभूमी टाळेबंद होती. आता रंगभूमीचे टाळे उघडले असले तरी प्रत्यक्ष काम सुरू व्हायला आणखीन महिने दोन महिने जाणार आहेत. काम सुरू झाल्यावरही उदरनिर्वाह चालेल अशी स्थिती कठीणच आहे. कुटुंब चालविण्याचा मार्ग रंगभूमीवरून सध्यातरी जाईल, असे सांगता येत नाही. वयाच्या विशिष्ट टप्प्यावर कुठे नोकरी मिळेल, याची शाश्वती नाही. हंगामी काम मजुरीशिवाय नाहीच. अशा स्थितीत अनेकांनी कुटूंबाच्या दबावाखाली रंगभूमीला कायमचा जरी नाही तरी पुढचे काही वर्ष रामराम ठोण्याचा निर्धार केला आहे. अशा संकटातून कोरोना काळात नागपूर-विदर्भाची रंगभूमी वाटचाल करत आहे.
मुलाची चिंता सतावतेघरातील पाच सदस्यांचा गाडा एकट्या मुलावर आहे. तो पूर्णवेळ नाटक आणि बॅकस्टेज करतो. जोवर व्यवस्थित सुरू होते, तोवर चिंता नसायची. आता मात्र, त्याचे कसे होईल, ही भीती वाटते. नाटक सोडत नाही म्हणतो आणि पैसा मिळत नाही, अशी स्थिती आहे. सध्या तो सीसीटीव्ही बसवण्याचे काम करून, घराला आधार देतो आहे. आमची जबाबदारी पार पाडत असला तरी त्याच्या भविष्याचे काय, अशी चिंता वाटते.- छबीबाई वासनिक
रंगकर्मी, गायक अन् नर्तकांचे क्षेत्र वेगळेपूर्णवेळ रंगकर्म, गायन आणि नृत्य कला जोपासणारे कलावंत नागपुरात बरेच कमी आहेत. अनेक कलावंत नोकरी, व्यवसाय सांभाळून आपली कला जोपासतात. गायन आणि नृत्यकलेत अशीच स्थिती दिसून येते. नाटक कला जपणारे काही कलावंत पूर्णवेळ या क्षेत्रात आहेत. त्यांची स्थिती सध्याच्या काळात दयनीय दिसून येते. काही गायकही केवळ कलेवरच पोट भरणारे आहेत. हे तिनव्हॉल्व्हही कला नागपुरात तरी स्वतंत्र दिसून येतात. कुटुंबातील एक जण नोकरीवर किंवा व्यवसायात असल्याने काही कलावंत पूर्णवेळ कलेसाठी समर्पित असल्याचेही दिसून येतात. मात्र, काहींची स्थिती तशी नाही. कला हीच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे माध्यम आहे. अशांची स्थिती बिकट झालेली आहे.
कार्यक्रमच नाहीत तर बॅकस्टेज कसे करावेमला प्रत्यक्ष रंगमंचावर उतरण्यापेक्षा रंगमंचामागे ज्या घडामोडी असतात, त्या सांभाळण्याची आवड आहे. नागपुरात बऱ्यापैकी रंगकर्मी होतो, म्हणून चंद्रपुरातून येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला मात्र गेल्या साडेसात महिन्यापासून रंगमंच अबोल झाला आहे. अशा स्थितीत रिकामाच आहे. आई-वडील हे काम सोड आणि भविष्याचा विचार कर असे म्हणतात. मात्र, रंगकर्म हेच जीवन म्हणून निवड केल्यावर हे सोडून भविष्य कसे असेल, ही भीती वाटते. माझ्या ज्येष्ठांच्या प्रोत्साहनामुळे आणि त्यांच्या मदतीमुळे मी अजूनही दुसरे काम स्वीकारले नाही. मात्र, असे किती दिवस काढावे हा प्रश्न आहे.- अक्षय खोब्रागडे, रंगमंच बॅकस्टेज आर्टिस्ट
नृत्य थांबले, संयम बाळगला आहेमी क्लासिकल, वेस्टर्न नृत्य करतो. माझे अनेक विद्यार्थी आहेत. मात्र, गेल्या साडेसात महिन्यात सर्वच थांबले आहे. पैसाच नाही तर घर चालवायचे कसे, हा प्रश्न आहे. संघटनेमार्फत शासकीय दिशानिर्देशासह नृत्य शिकवण्या सुरू करावे, असे प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. जागेचे भाडे तर दूर रोजचा खर्चही निघेनासा झाला. आता अनलॉक झाले तर बघू काय होते ते.- लकी तांदूळकर, नृत्य दिग्दर्शक