शरद मिरे
भिवापूर : पारधी बेड्यात पाय ठेवण्यास प्रशासनही मागे-पुढे पाहते. त्यामुळे कुठलाही उपक्रम राबविताना आधी पारधी बांधवांना विश्वासात घ्यावे लागते. त्यांनी नाही म्हटले तर बेड्यात पाय ठेवणेही कठीण होते. कोरोना संसर्गाने अख्ख्या तालुक्याला शिवले. मात्र गरडापार पारधी बेड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही की कळले नाही. कारण येथे तपासणी, निदान आणि उपचारास विरोध आहे. लसीकरण तर लांबच राहिले. ‘आम्हाला काही होत नाही’ असा आक्रमक सूर येथे आळवला जातो. त्यामुळे प्रशासनालाही मग एक पाऊल मागे सरकावे लागते. कदाचित पारधी बेड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झालाही असेल, पण कुणालाही कळले नाही.
पाहमी गट ग्रामपंचायती अंतर्गत गरडापार ही अंदाजे २५० पारधी बांधवाची वस्ती आहे. मोहफुलातून दारूची निर्मिती आणि विक्री हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. चिमुकल्यांपासून तर वयोवृद्ध आणि महिला भगिनी सुद्धा तितक्याच आक्रमक असल्यामुळे पारधी बेड्यात पाय ठेवताना अधिकाऱ्यांना दहा वेळा विचार करावा लागतो. येथील पारधी बंधू-भगिनी कधी अंगावर धावून येईल याचा नेम नाही. अशातच देशात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाला. संसर्गाची दुसरी लाट तर गावात आणि घराच्या दारापर्यंत पोहोचली. प्रशासन कामाला लागले. गावागावात कोविड तपासणीचे पथक पोहोचले. तसे गरडापारमध्येही पोहोचले. मात्र वर्षभराच्या कालखंडात येथे कुणीही कोविड तपासणी केली नाही. लसीकरणाला सुद्धा येथे नकारच मिळाला. त्यामुळे गरडापार येथील पारधी बेड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झालाही असेल, मात्र तो कोणालाच कळले नाही. प्रशासनालाही दिसले नाही. कोविड तपासणी, निदान आणि उपचारासोबतच प्रत्येकाने लस घ्यावी. यासाठी प्रशासन आग्रही आहे. मात्र पारधी बेड्यात प्रशासनाच्या या आग्रहाला कुठेच थारा मिळत नाही.
गावात केवळ तिघांनीच घेतली लस
पाहमी ग्रामपंचायती अंतर्गत गरडापार पारधी बेड्याची लोकसंख्या अंदाजे २५० च्या वर आहे. मात्र आतापर्यंत अख्ख्या पारधी बेड्यात केवळ तिघांनीच कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली. त्यामागचे कारणही महत्त्वाचे आहे. यातील एक ग्रामपंचायतीचा कर्मचारी आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी लस घेतली. बेड्यातीलच एका लोकप्रतिनिधीने अद्यापही लस घेतलेली नाही.
लसीकरण वाढीसाठी नियोजन
गरडापार पारधी बेड्यात लसीकरणाला प्रतिसाद मिळावा. यासाठी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, गटविकास अधिकारी माणिक हिमाने, सरपंच विजय कारेमोरे, उपसरपंच सुनंदा पवार, ग्रामसेवक सुरेंद्र सवाईमुल प्रयत्न करत आहेत. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने नियोजन केले असून, येत्या आठवडाभरात त्याची अंमलबजावणी केली जाईल.
===Photopath===
280621\1653img-20210628-wa0048.jpg
===Caption===
गरडापार पारधी बेड्यात आयोजीत जनजागृती कार्यक्रम बघतांना पारधी बांधव