लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या निर्बंधामुळे आर्थिक आणि सामाजिक परिणाम दिसून येत आहेत. अनेकांची नोकरी गेल्याने, काहींचे वेतन कमी झाल्याने तर काहींचा व्यवसाय ठप्प पडल्याने मानसिक तणावात आहे. यातच सतत मोबाईलच्या वापरामुळे अनेकांची झोप उडाली आहे. विशेषत: दिवसभर फोन वापरून सुद्धा रात्री झोपताना फोन हातात घेतला जातो. फोनमधून बाहेर पडणाऱ्या तरंगामुळे डोळ्यांवर आणि हार्माेन्सवर परिणाम होतो. त्यामुळे शरीर रिलॅक्स होऊ शकत नाही. झोप प्रभावित होऊन झोपेचा कालावधी कमी झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
आधुनिक काळात मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप याचा वापर आयुष्याचा एक भाग झाला आहे. लहानग्यापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक जण मोबाईलचा अधीन झालेला आहे. सध्या मोबाईल हा जीवनातला अविभाज्य घटक आहे. डिव्हाईसच्या वापराची सवय लागल्याने मोबाईलशिवाय चैन पडत नाही. स्मार्टफोन वापरण्याचे दुष्परिणाम अनेक आहेत. त्यातही रात्री लाईट बंद करून फोन बघत बसणाऱ्याना नंतर गंभीर परिणाम भोगायला लागतात. मोबाईलच्या अतिवापराने झोपेवर परिणाम होतो सोबतच थकवा येणे, एकाग्रता कमी होणे, चक्कर येणे, मळमळणे, पोट बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-‘वेब सिरीज’ही ठरतेय कारण
कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून चित्रपटगृहांना टाळे लागले आहे. त्यामुळे अनेक ‘वेब सिरीज’ मोबाईलवरच प्रदर्शित होत आहे. या सिरीज पाहणाऱ्या तरुणांचीच नव्हे तर ज्येष्ठ मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रात्री २ ते ३ वाजेपर्यंत तर काही संपूर्ण रात्रभर ‘वेब सिरीज’ पाहतात. अशांचे झोपेचे वेळापत्रकच पार बदलून गेले आहे. यामुळे वेळीच सावध होऊन झोपेची गरज लक्षात घेणे आवश्यक आहे.
-पुरेशी झोप न झाल्यास रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते
अपूर्ण किंवा कमी झोपेमुळे शारीरिक व मानसिक व्याधी जडतात. मेडिकलच्या श्वसनरोग विभागाने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात पुरेशी झोप न झाल्यास रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊन कोरोना होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढत असल्याचे समोर आले आहे. ६३ टक्के कोरोनाबाधितांना कोरोना होण्यापूर्वी झोपेची समस्या होती.
-निरोगी आरोग्यासाठी झोप महत्त्वाची
झोप लागणे, ती अखंड टिकलेली असणे आणि झोपेतून जागे झाल्यावर ताजेतवाने वाटणे हे निरामय स्थितीचे लक्षण आहे. या तिन्ही घटनांपैकी कोणतेही एक किंवा तिन्हीत आलेल्या अडचणीला निद्रानाश म्हणतात. दीर्घ काळ निद्रानाश हे मानसिक संतुलन बिघडण्यासोबतच विविध गंभीर आजारांना आमंत्रण देते.
-डॉ. सुशांत मेश्राम, प्रमुख, श्वसनरोग विभाग व निद्रा विशेषज्ञ, मेडिकल
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको
झोप लागत नसेल तर परस्पर गोळी घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच गोळी घ्यावी. नैसर्गिक झोप येण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी. झोपेची गोळी घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक करण्यात आले आहे. औषध विक्रेत्यांनी त्याचे पालन करावे.
:: चांगली झोप येण्यासाठी हे करा
-झोपेच्या दोन तासापूर्वी मोबाईलपासून दूर रहा
-झोपण्यापूर्वी सिगारेट किंवा मद्यपान करू नका
-झोपण्यापूर्वी आवडीचे संगीत ऐका
-नैसर्गिक झोपेसाठी प्रयत्न करा
:: वयोगटानुसार अशी असावी झोप
-० ते १ वयोगटासाठी २२ तासांची झोप
-१ ते ५ वयोगटासाठी १२ तासांची झोप
-६ ते १२ वयोगटासाठी १० तासांची झोप
-१३ ते १८ वयोगटासाठी ८ ते ९ तासांची झोप
-१९ ते ४५ वयोगटासाठी ७.३० ते ८ तासांची झोप
-४६ व त्यावरील वयोगटासाठी ७ तासांची झोप