नागपूर : कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. सलग दुसऱ्या दिवशी, गुरुवारी रुग्णांची संख्या हजारावर गेली. १,११६ नव्या रुग्णांची नोंद झाली. धक्कदायक म्हणजे, मागील दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूंची संख्या १३ झाली. यामुळे आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. एकूण रुग्णसंख्या १,४६,८३१ झाली असून मृतांची संख्या ४,३१४ वर पोहचली. विशष म्हणजे १,०२८ रुग्ण बरे झाले.
नागपूर जिल्ह्यात तिसऱ्यांदा चाचण्यांची संख्या १० हजारांच्या घरात गेली. आज ५,९६१ आरटीपीसीआर तर ४,६५० रॅपिड अँटिजेन अशा एकूण १०,६११ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. शहरातील पाचपैकी माफसु येथील प्रयोगशाळा सोडल्यास उर्वरित चारही प्रयोगशाळेत क्षमतेनुसार तपासण्या केल्या जात आहेत. गुरुवारी सर्वाधिक चाचण्या मेडिकलच्या प्रयोगशाळेत झाल्या. १,४४२ तपासण्या करण्यात आल्या. यातून १९९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेयोच्या प्रयोगशाळेत १,२४२ चाचण्यांमधून १४६ पॉझिटिव्ह, एम्सच्या प्रयोगशाळेत ९९७ चाचण्यांमधून १२९, नीरीच्या प्रयोगशाळेत २७१ चाचण्यांमधून ६९, नागपूर विद्यापीठाच्या प्रशाळेत ५११ चाचण्यांमधून ८८ बाधित रुग्णांची नाेंद झाली. सर्व खासगी लॅब मिळून १,४९८ नमुने तपासण्यात आले. यात ४२६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अँटिजेनमधून ५९ तर आरटीपीसीआरमधून १०५७ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
-शहरात ८२६, ग्रामीणमध्ये २८८ नवे रुग्ण
आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील ८२६, ग्रामीणमधील २८८ तर जिल्ह्याबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ९, ग्रामीणमधील २ तर जिल्ह्याबाहेरील २ मृत्यू आहेत. शहरातील एकूण रुग्णसंख्या १,१७,२०१ व मृत्यूंची संख्या २,७९२ झाली. ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या २८,६९६ तर मृत्यूंची संख्या ७७० झाली आहे.
-१,३५,२५८ रुग्ण कोरोनामुक्त
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. आज १०२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १,३५,२५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२.१२ टक्के आहे. सध्या ७,२५९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील ४,९०० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर २,३५९ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात भरती आहेत.
-दैनिक चाचण्या : १०,६११
-बाधित रुग्ण : १,४६,८३१
_-बरे झालेले : १,३५,२५८
- उपचार घेत असलेले रुग्ण : ७,२५९
- मृत्यू : ४,३१४