नागपूर : कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर २.५४ टक्क्यांवर आला आहे. नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नियंत्रणात येत आहे. यातच कोरोनाच्या मृत्यू दरात सातत्याने घटही दिसून येत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. रविवारी हा दर १.८७ टक्क्यांवर आला. शहरात २२० रुग्ण, ५ मृत्यू, ग्रामीणमध्ये १३२ रुग्ण व ३ मृत्यू, तर जिल्ह्याबाहेर ५ रुग्ण व ५ मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्याची दैनंदिन रुग्णसंख्या ३५७ ,तर मृत्यूची संख्या १३ वर पोहोचली.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात झाली. मार्च व एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. मात्र, मागील ३० दिवसात कोरोनाचा कहर ओसरायला लागला. रविवारी नागपूर जिल्ह्यात १४,०३७ चाचण्या झाल्या. यात शहरात १०,३९१, तर ग्रामीणमध्ये ३,६४६ चाचण्यांचा समावेश होता. शहरात रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर २.११ टक्के, तर ग्रामीणमध्ये ३.६२ टक्के होता. आज नोंद झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक रुग्ण, १०४१ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९६.७० टक्क्यांवर गेले आहे.
- शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये होम आयसोलेशनमध्ये रुग्ण अधिक
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना गृह विलगीकरण म्हणजे, होम आयसोलेशनमध्ये ७७ हजारावर रुग्ण होते. रविवारी यांची संख्या ४५०८ वर आली. विशेष म्हणजे, ग्रामीणच्या तुलनेत शहरात होम आयसोलेशन रुग्णांची संख्या कमी आहे. शहरात १७५२, तर ग्रामीणमध्ये २८५६ रुग्ण आहेत. यात सर्वाधिक, ६२६ रुग्ण नागपूर ग्रामीण ब्लॉकमध्ये, हिंगणा ब्लॉकमध्ये ५५१, तर कळमेश्वर ब्लॉकमध्ये ३८०, तर उर्वरित ब्लॉकमध्ये २००च्या आत रुग्ण आहेत.
:: कोरोनाची रविवारची स्थिती
दैनिक चाचण्या : १४,०३७
शहर : २२० रुग्ण व ५
ग्रामीण : १३२ रुग्ण व ३
ए. बाधित रुग्ण : ४,७४,२८६
ए. सक्रिय रुग्ण : ६,७८१
ए. बरे झालेले रुग्ण : ४,५८,६१३
ए. मृत्यू : ८८९२