लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महापालिकेची यंत्रणा कोरोना संकटाचा सामना करण्यात व्यस्त आहे. परंतु, सलग दुसऱ्या वर्षी शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे होण्याची शक्यता दिसत नाही. शहराच्या सर्वच भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्तीची गरज आहे. मागील चार-पाच वर्षांत सिमेंट काँक्रीट रस्त्यांवर ४०० ते ५०० कोटी खर्च करण्यात आले. परंतु, काही सिमेंट रस्ते एक-दीड वर्षांतच उखडले. या रस्त्यांची दुरुस्ती कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वर्षभरात शहरातील कामे जवळपास ठप्पच आहे. पावसाला सुरुवात झाली की, शहरातील डांबरी रस्त्यावर खड्डे पडतात. नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून खड्डे दुरुस्तीचा दावा केला जातो. परंतु, खड्डे बुजवले जात नाहीत. रस्ते दुरुस्तीचे बील मात्र काढले जाते. गाजावाजा करून सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आली. ३० ते४० वर्षे या रस्त्यांना काही होणार नाही, असा दावा करण्यात आला. परंतु, हुडकेश्वर सिमेंट रोवडर वर्षभरातच मोठे खड्डे पडले आहेत. अशीच अवस्था विविध भागांतील रस्त्यांची आहे.
...
दायित्व कालावधी संपण्यापूर्वीच खड्डे
रस्त्याचे काम केल्यानंतर दोन वर्षांचा दायित्व कालावधी असतो. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत महापालिकेने जवळपास ६०० रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. यातील शंभराहून अधिक रस्त्यांचा दायित्व कालावधी संपण्यापूर्वीच अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. सुरुवात होताच पावसामुळे खड्डे पडल्याचे कारण पुढे करून कंत्राटदार मोकळे होतील.
...
खड्डे बुजवण्यावर कोट्यवधीचा खर्च
शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. यासाठी दरवर्षी १० ते १२ कोटींची तरतूद केली जाते. प्रत्यक्षात त्याहून कितीतरी पट अधिक खर्च केला जातो. जेट पॅचरच्या माध्यमातून खड्डे बुजवण्यावर वर्षाला १५ ते १६ कोटी खर्च केले जातात. दुसरीकडे हॉटमिक्स प्लांटवर कोट्यवधीचा निधी खर्च केला जातो. कोट्यवधीचा खर्च करूनही खड्ड्यांची समस्या दरवर्षी निर्माण होते.
...
सभागृहातील निर्णय कागदावरच
पावसाळ्यात उद्भवणारी खड्ड्यांची समस्या सोडविण्यासाठी रस्त्यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी नवीन प्रस्ताव आणण्याचा निर्णय सभागृहाने घेतला होता. त्यात रस्त्यांची दर पंधरा दिवसांनी अधिकारी पाहणी करतील़ अभियंत्यांना रस्त्यांच्या तातडीने फाईल मंजुरीचे अधिकार द्यावे. चांगल्या प्रतीचे डांबर वापरण्यात यावे. याशिवाय दायित्व कालावधी पाच वर्षे करण्याचा प्रस्ताव होता. परंतु, याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
......
असे आहेत शहरातील रस्ते
महापालिका २१७१़ ९९ किमी
राष्ट्रीय महामार्ग २९़ ८० किमी
राज्य महामार्ग ६.७० किमी
जिल्हा मार्ग ६२़ ५७ किमी