नागपूर : जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लोट ओसरली असून, कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. १ जूनपासून निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असून पुढील काळ हा जनतेसाठी परीक्षेचा ठरणार आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांतच नागपुरातील बाजारपेठांमध्ये सकाळच्या सुमारात गर्दी दिसून आली. बुधवारी तर इतवारी, महालमधील रस्त्यांवर कोंडी दिसून आली. पहिल्या लाटेनंतर अनलॉकमध्ये जनतेचे नेमक्या काही चुका केल्या होत्या. त्यामुळे जनतेने या पाच चुका टाळण्याची अतिशय जास्त आवश्यकता असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ व प्रशासनातून व्यक्त होत आहे.
अनावश्यक गर्दी नको
पहिल्या लाटेदरम्यान निर्बंध शिथिल केल्यानंतर नागरिकांनी खरेदीसाठी तुफान गर्दी केली होती. कोरोनाच्या धोक्याची जाण न ठेवता कुटुंबेच्या कुटुंबे लहानसहान खरेदीसाठी बाहेर जात होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने झाला व दुसऱ्या लाटेत मोठे नुकसान झाले. तिसरी लाट टाळायची असेल तर अनावश्यक गर्दी टाळणे आवश्यक आहे. विशेषत: खरेदीसाठी घरातील एक व्यक्ती गेली तरी पुरेसे ठरू शकणार आहे.
मास्क घाला, थुंकणे टाळा
घराबाहेर निघाल्यानंतर मास्क घालणे आवश्यकच आहे. मात्र अनेकांनी बेफिकिरी दाखवत मास्क घातले नाही व बरेच जण हनुवटीखाली मास्क घालून फिरायचे. त्यामुळे अशा लोकांना कोरोनाचा लवकर संसर्ग झाला. अनेक जण बेजबाबदारपणे रस्त्यांवर थुंकताना दिसून येतात. यामुळे विषाणूचा फौलाव होण्याचा धोका असतो. शिवाय अशा लोकांमुळे इतरांनादेखील संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झालेच पाहिजे.
संयम पाळा, सोहळे टाळा
पहिल्या लाटेनंतर डिसेंबर महिन्यात लग्नसराईला तोबा गर्दी झाली होती व जानेवारी महिन्यानंतर रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. पुढील काहीकाळ सोहळे मोठ्या प्रमाणावर करणे टाळणे आवश्यक झाले आहे. घरगुती स्वरूपात होणाऱ्या लग्नसोहळ्यात किंवा इतर समारंभात आवश्यक तेवढेच लोक बोलविले पाहिजे. या समारंभातून कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असते.
लक्षणांकडे दुर्लक्ष नको
पहिली लाट ओसरल्यानंतर अनेकांनी कोरोना गेला असाच समज करून घेतला. कोरोनाची लक्षणे दिसल्यावरदेखील चाचणी करण्यास लोकांनी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनादेखील लागण झाली. चाचणी उशिरा झाल्याने उपचार वेळेत मिळाले नाही व अनेकांचा त्यामुळे मृत्यू झाला. सौम्य लक्षणे दिसली तरी लगेच चाचणी करणे आवश्यक आहे.
आउटिंगचा उत्साह आवरता घ्या
डिसेंबर-जानेवारी महिन्यात नागपुरात अनेक जणांनी सहलीचे आयोजन केले. देशातील इतर पर्यटन स्थळांवरदेखील गेले. असे करत असताना आवश्यक ती काळजी घेतली नाही. परिणामी अनेकांना त्यातून कोरोनाची लागण झाली. त्यामुळे काहीकाळ संयम ठेवून आउटिंगचा उत्साह आवरता घेतला पाहिजे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
पालिकेची ११ पथके
शहात कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे पालन होते का, याकडे लक्ष देण्यासाठी महापालिकेने झोननिहाय पथके नेमली आहेत. यात सुमारे १८० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पथकाने कडक निर्बंध असताना नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली. आता पुढेदेखील अशीच कारवाई सुरू ठेवली पाहिजे.
जिल्ह्यातील पहिला अनलॉक
जून २०२०
एकूण कोरोना रुग्ण - १,५०३
दुसरा अनलॉक
जून २०२१
एकूण कोरोना रुग्ण -४,७५०१२
बरे झालेले - ४,६०,९२४
मृत्यू - ८,९२५