कामठी : नागपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित व मृत्यूदर कमी होत आहे. ही आनंदाची बाब असली तरी दुसरीकडे रस्त्यावरची गर्दी चिंता वाढविणारी आहे. त्यामुळे नागपूर महानगराच्या आजूबाजूच्या शहरातील नगरपालिकांनी सावधतेने प्रतिबंधात्मक कारवाई सुरू ठेवावी. कोणत्याही परिस्थितीत नागपूर जवळील शहरे कोरोनाची हॉटस्पॉट होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.
कामठी नगर परिषद येथील कोविड आढावा बैठकीत ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नगराध्यक्ष मोहम्मद शहाजहाँ शफाअत उपस्थित होते. नागपूर शहरात विविध खासगी आस्थापनावर काम करणाऱ्या कामगारांची व मजूर वर्गाची मोठी लोकसंख्या शहराच्या आजूबाजूला आहे. याशिवाय धाबे, हॉटेल्स, रेस्टॉरंट याठिकाणी काम करणारा वर्ग या परिसरात राहतो. या सर्वांचा अनेकांशी संपर्क येतो. त्यामुळे प्रत्येकाचे लसीकरण होईल, याकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लसीकरणाच्या कार्यात मदत करावी. कामगारांच्या, मजुरांच्या वस्तीमध्ये लसीकरणाबाबत आवश्यक संदेश द्यावा. कामठी शहरात रुग्णसंख्येत कमी आली असली तरी रस्त्यावरील गर्दी बघता तिसऱ्या लाटेला निमंत्रण दिले जाणार नाही, यासाठी प्रशासनासोबत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी, पदाधिकारी यांनी देखील मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
मान्सूनपूर्व कामाचा आढावा
जिल्हाधिकाऱ्यांनी कामठी शहरातील मान्सूनपूर्व कामाचा आढावा याप्रसंगी घेतला. नालेसफाई व स्वच्छता मोहिमेला गंभीरतेने पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.