नागपूर : कुठल्याही प्रकारची कोरोना चाचणी केली नसताना तुकडोजी चौकालगतच्या रघुजीनगर परिसरातील म्हाडा कॉलनीतील नागरिकांना अँटिजन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा एसएमएस प्राप्त झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे.
सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास दोन आरोग्य सेविकांनी रघुजीनगर येथील म्हाडा कॉलनी परिसरात घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहे का, अशी विचारणा करून नागरिकांची नावे, मोबाईल क्रमांक लिहून घेतले. बहुसंख्य नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याची माहिती पथकाला दिली. औनिश महाले, रवी राजणीकर यांच्यासह इतरांनी पथकाला दोन्ही डोस घेतल्याची माहिती देऊन आपला व पत्नीचा मोबाईल क्रमांक सांगितला. याशिवाय दुसरी कुठलीही माहिती दिली नाही. सोमवारी सायंकाळच्या सुमारास परिसरातील ज्या नागरिकांनी पथकातील आरोग्य सेविकांना मोबाईल क्रमांक दिला होता, अशा नागरिकांना स्वॅब न घेता अँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आल्याचा एसएमएस मिळाला. अशा स्वरूपाचा मॅसेज १० ते १५ लोकांना आल्याची माहिती रवी राजणीकर यांनी दिली.
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना चाचणी न करता पॉझिटिव्ह असल्याचा मॅसेज येत असल्याने नागरिकात संभ्रम निर्माण होत आहे. प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालून हा प्रकार थांबविण्यात यावा, अशी मागणी रघुजीनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
माहिती घेऊन चौकशी करणार
स्वॅब न घेता चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याबाबत आताच माहिती मिळाली आहे. याबाबत अधिक माहिती घेऊन चौकशी केली जाईल. त्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल.
- राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, मनपा